कल्याण- बँक ऑफ बडोदाचे बनावट संकेतस्थळ तयार करुन त्या संकेतस्थळावरुन कल्याण मधील एका वकिलाला ई मेल, सेवासंपर्क क्रमांकावरुन संपर्क करुन ‘तुम्हाला तुमच्या खात्या मधील काही हिशेब न लागणारी रक्कम परत करायची आहे“ असे खोटे सांगून गेल्या महिनाभराच्या कालावधीत भामट्याने वकिलाची ४९ हजार ९५३ रुपयांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केली आहे. १० ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२२ च्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. ॲड. दीपक माणिकलाल ठककर (५४, रा. प्रथमेश सोसायटी, आग्रा रोड, कल्याण) असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बदलापूरः बारवी प्रकल्पग्रस्तांना अखेर मिळाले नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र; प्रकल्पग्रस्त तरूणांना अभियंत्यांसह ‘या’ पदांवर संधी

हेही वाचा >>> वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाने देणग्यांची नियमबाह्य वसुली; देणगी वसुलीसाठी तोतया कार्यकर्तीचा डोंबिवलीत संचार

बाजारपेठ पोलिसांनी सांगितले, एका अनोळखी भामट्याने गेल्या महिनाभरात ॲड. दीपक ठक्कर यांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधला. बडोदा बँकेचे एक बनावट संकेतस्थळ तयार करुन आपण बँकेतून तुम्हाला ईमेल पाठवित आहोत, असे दाखविण्यास सुरुवात केली. तुमच्या ठक्कर असोसिएशन लाॅ फर्मच्या बडोदा बँक खात्यामध्ये काही रक्कम आहे. ती तुम्हाला परत करायची आहे. त्यासाठी तुम्हाला काही प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करायच्या आहेत, असे भामटा ॲड. ठक्कर यांना सांगत होता. यासाठी तुम्ही मला तुमच्या डेबीट कार्डचे तपशील द्या. बँकेतून कर्मचारी बोलतो असे वाटून ॲड. ठक्कर यांनी भामट्याने पाठविलेल्या जुळणीला प्रतिसाद दिला. जुळणी उघडताच ॲड. ठक्कर यांच्या खात्यामधून ४९ हजार ९५३ रुपये परस्पर भामट्याच्या खात्यात वर्ग झाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांची गरीबांसाठीची ‘दिवाळी भेट’ शिधावाटप दुकानात पोहचलीच नाही; शिधावाटप दुकानदार दुहेरी कोंडीत

आपण बँकेतून रक्कम काढली नाही. याऊलट आपल्या बँक खात्यात रक्कम जमा होणे आवश्यक असताना ती रक्कम अन्य खात्यात वर्ग झाल्याने वकिल ठक्कर यांनी भामट्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाली आहे. हे लक्षात येताच ॲड. ठक्कर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of a lawyer kalyan creating fake website of bank of baroda ysh