डोंबिवली पूर्वेतील दावडी येथील साई ऑर्किड इमारतीमधील सदनिका विक्री करण्याचे करारनामे आम्ही केले आहेत, अशी खोटी माहिती डोंबिवलीतील सदनिका खरेदीदारांना देऊन त्यांच्याकडून सात लाख ६० हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक करणाऱ्या विकासका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशील राजाराम हिंदळेकर (रा. यशगंगा काॅम्पलेक्स, सागाव, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते नोकरदार आहेत. अनिल राममूर्ती सिंग, नीरज अनिल सिंग (रा. शितल आर्केड, चित्तरंजनदास रोड, रामनगर, डोंबिवली पूर्व) अशी आरोपींची नावे आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील पाटकर रस्त्यावर येवले चहा गाळ्या समोर हा प्रकार ऑक्टोबर २०२१ ते आजच्या दिवसापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, अनमोल एन्टप्रायझेसचे भागीदार अनिल सिंग, नीरज सिंग यांनी आपसात संगनमत करून २७ गावातील दावडी येथील साई ऑर्किड इमारती मधील सदनिका विक्रीचे करारनामे आम्ही केले आहेत असे डोंबिवलीतील रहिवासी फिर्यादी सुशील हिंदळेकर, त्यांचा भाऊ सत्यवान आणि त्यांची परिचीत वैशाली पटणे यांना सांगितले. सिंग विकासकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन साई ऑर्किड मध्ये सदनिका खरेदीची तयारी सुशील हिंदेळकर यांनी केली. सदनिका मुद्रांक शुल्क व्यवहाराकरिता सिंग विकासकाने सुशील यांच्याकडून पाच लाख रुपये, भाऊ सत्यवान यांच्याकडून दोन लाख आणि वैशाली यांच्याकडून ६० हजार रुपये उकळले. हे पैसे विकासकाने ऑनलाईन, रोखीने स्वीकारले.
गेल्या वर्षभरात सदनिकेचा ताबा मिळण्यासाठी या तिघांनी विकासक सिंग यांच्याकडे तगादा लावला. सदनिका मिळत नसल्याने त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केले. विकासक सिंग यांनी आपली रक्कम स्वताच्या फायद्यासाठी वापरली. आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यावर सुशील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. आपल्याप्रमाणे इतरांचीही त्याने अशीच फसवणूक केली आहे, असे तक्रारदाराच्या लक्षात आले. तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.