डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागातील सारस्वत काॅलनी मधील एका दाम्पत्याने एका घर खरेदीदाराची फसवणूक केली आहे. तक्रारदार घर खरेदीदाराला विकलेली सदनिका दाम्पत्याने दुसऱ्या एका व्यक्तिला विकली असल्याचा प्रकार उघडकीला आल्याने पहिल्या घर खरेदीदाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रल्हाद शिलवंत (६२) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त गृहस्थाचे नाव आहे. ते सारस्वत काॅलनीमधील पंचायत बावडी भागात राहतात. चिंतन पांचाळ (४५), प्रिती चिंतन पांचाळ (४२, रा. सनफ्लाॅवर सोसायटी, आचलकर इमारत, व्ही. पी. रोड, डोंबिवली पूर्व) असे गुन्हा दाखल दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, प्रिती आणि चिंतन पांचाळ यांनी संगनमत करुन तक्रारदार प्रल्हाद शिलवंत यांना आपली सनफ्लाॅवरमधील सदनिका ऑक्टोबर २०१६ मध्ये २२ लाख रुपयांना धनादेश आणि रोख स्वरुपात विकली होती.

हेही वाचा >>> Weather Update : ठाणे जिल्ह्यात बदलापुरात सर्वाधिक पावसाची नोंद; २४ तासात २७३ मिलीमीटर पाऊस

खरेदी व्यवहार पूर्ण झाल्याने सदनिका आपल्या नावावर करा म्हणून प्रल्हाद पांचाळ दाम्पत्याच्या मागे तगादा लावून होते. विविध कारणे देऊन ते प्रल्हाद यांच्या नावावर सदनिका करुन देण्यास टाळाटाळ करत होते. दरम्यानच्या काळात पांचाळ दाम्पत्याने प्रल्हाद यांना काहीही कळू न देता त्यांना विकलेली सनफ्लाॅवर मधील सदनिका परस्पर राजेंद्र सिंग यांना विकली. सिंग यांनाही आपण खरेदी करत असलेली सदनिका यापूर्वी पांचाळ दाम्पत्याने कोणाला विकली आहे हे समजले नाही. पांचाळ दाम्प्त्याने हा प्रकार सिंग आणि शिलवंत यांच्यापासून लपून ठेवला.

सिंग यांना सदनिका विकल्याने आपले २२ लाख रुपये परत करा अशी मागणी शिलवंत यांनी केली. त्यांना पांचाळ यांनी १३ लाख ५० हजार रुपये परत केले. उर्वरित रक्कम देण्यास ते टाळाटाळ करत असल्याने शिलवंत यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of home buyer in dombivli complaint in police station ysh
Show comments