तिकीट तपासणीस आणि मदतनीस म्हणून रेल्वेच्या सेवेत नोकरी देण्याच्या आमिषाने ५९ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार अंबरनाथ पूर्व परिसरात समोर आला आहे. सुशीला देशवारे असे या आरोपी महिलेचे नाव असून या महिलेने तब्बल १३ जणांची फसवणूक केली आहे.
गेल्या काही दिवसात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकार अंबरनाथ शहरात समोर आले आहे. यापूर्वीही भारतीय रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून काही नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली होती. तसाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा अंबरनाथ शहरात समोर आला आहे. अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नुकताच याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश दगडू चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यासह मयूर चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, चेतन चौधरी, राहुल चौधरी, जगदीश वाघ, संदीप शेलार, राहुल चौधरी, गणेश चौधरी, अविनाश चौधरी, पवन चौधरी, निळकंठ चौधरी आणि धनंजय ठाकरे अशा तेरा जणांकडून सुशीला देश वारे आरोपी महिलेने ऑगस्ट २०१८ ते १० जानेवारी २०२२ या चार वर्षांच्या काळात तब्बल ५९ लाख रुपये घेतले. त्या बदल्यात भारतीय रेल्वेत तिकीट तपासणीस आणि मदतनीस म्हणून कामाला लावतो असे आश्वासन या महिलेने दिले होते.
नोकरी नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याचे कळतच या १३ जणांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही महिला अंबरनाथ मधील राहणारी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या महिला आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.