कल्याण- मी स्टेट बँकेतून बोलतो. तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चित करण्यासाठी (केवायसी) तुमची आवश्यक कागदपत्र पाठवून द्या. ती कागदपत्र ऑनलाईन स्थापित केल्यानंतर तुम्हाला येणारा गुप्त संकेतांक मला कळवा. असे कल्याण मधील एका ज्येष्ठ नागरिकाला मोबाईलवरुन सांगून त्यांच्या आणि पत्नीच्या खात्यामधील एकूण दोन लाख २४ हजार ९८७ रुपयांची रक्कम भामट्याने स्वताच्या नावे वळती करुन ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे.
२५ ऑगस्ट रोजी हा प्रकार सकाळी आठ ते पावणे आठच्या दरम्यान घडला. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, अरुण किशन शर्मा (६५, रा. सुखवास्तू, वसंत व्हॅली, गंधारे, कल्याण पश्चिम) यांना २५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता एका मोबाईलवरुन फोन आला. ‘मी स्टेट बँकेतून बोलतो. तुमच्या खात्याचे केवायसी नुतनीकरण करायचे आहे. यासाठी तुम्ही आम्हाला तुमचे व पत्नीचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी माहिती द्या’. त्याप्रमाणे अरुण शर्मा यांनी व्यवहार सुरळीत राहावेत म्हणून विनाविलंब तोतया स्टेट बँक कर्मचाऱ्याने मागितलेली कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीेने जमा केली.
ही कागदपत्र जमा केल्यानंतर अरुण शर्मा यांना एक गुप्त संकेतांक आला. तोही त्यांनी भामट्याला स्वताहून फोन करुन दिला. आपली फसवणूक होत होणार आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. हा गुप्त संकेतांक भामट्याने घेताच अरुण यांच्या पत्नी आणि त्यांच्या स्टेट बँकेतील संयुक्त बँक खात्यामधून दोन लाख रुपये आणि अरुण आणि त्यांची मुलगी रिया यांच्या खात्या मधून २४ हजार ९८७ रुपये असे एकूण दोन लाख २४ हजार ९८७ हजार भामट्याने दोन व्यवहारांमध्ये स्वताच्या बँक खात्यामध्ये वळते करुन घेतले.
हा प्रकार अरुण शर्मा यांच्या उशिरा निदर्शनास आला. त्यांनी पासबुक व्यवहाराचे अद्ययावतीकरण केले, तेव्हा त्यांना आपल्या बँक खात्यामधून परस्पर पैसे वळते करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळाली. त्यांनी बँकेला घडला प्रकार सांगितला. बँकेकडून त्यांना तुमची फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.