लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील लोढा धाम भागात क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून एका वृद्धाकडील सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी काढून घेत त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा भागात फसवणूक झालेले ७० वर्षीय व्यक्ती राहतात. शनिवारी ते कामानिमित्ताने त्यांच्या मोटारीने भिवंडीत आले होते. ते मुंबई नाशिक महामार्गावरील लोढा धाम परिसरात आले असता, दोन भामट्यांनी त्यांची मोटार अडविली. क्राइम ब्रांचचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे दागिने एका कागदामध्ये ठेवण्यास सांगितले. वृद्धाने त्यांच्याकडील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून कागदामध्ये ठेवली. त्यानंतर त्या दोन्ही भामट्यांनी त्यांना बोलण्यामध्ये गुंतविले.

आणखी वाचा-बेकायदा बांधकामांच्या जागी उद्योगांचाही समूह विकास; ‘क्लस्टर’ला गती देण्यासाठी एमआयडीसी-महापालिकेची साडेबारा टक्के योजना

काही वेळाने मोटारीतील कप्प्यात दागिने ठेवतो असे भामट्यांनी सांगितले. परतु त्यांनी दागिन्यांनी भरलेला कागदाची आदला-बदल करत दागिन्यांऐवजी दगडांनी भरलेला कागद तेथे ठेवला. त्यानंतर ते दोन्ही भामटे तेथून निघून गेले. काहीवेळाने वृद्धाने दागिने तपासले असता, त्यामध्ये दगड आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader