ठाणे – कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथील एका अंध दाम्पत्याची फसवणूक करून त्यांना कोणत्याही स्वरूपाची माहिती न देता त्यांचे नवजात बाळ छत्तीसगड राज्यातील एका जोडप्याला परस्पर दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंध दाम्पत्याने तक्रार केल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या वतीने हस्तक्षेप केल्यानंतर मोहने येथे गणपती नर्सिंग होम नावे दवाखाना चालवणाऱ्या अनुराग धोनी या डॉक्टर विरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.

कल्याण तालुक्यातील मोहना गोळेगाव येथे एक अंध दाम्पत्य राहते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले आहेत. यातील अंध महिला पुन्हा तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्याने ते गावातील गणपती नर्सिंग होम येथे डॉक्टर अनुराग धोनी यांच्याकडे तपासणीसाठी गेले. यावेळी त्यांना हे बाळ नको असल्याचे त्यांनी डॉक्टर धोनीला सांगितले. मात्र आता तुम्ही तीन महिन्यांच्या गरोदर असून गर्भपात करता येणार नसल्याचे डॉक्टर धोनीने त्या अंध दाम्पत्याला सांगितले. मात्र तुम्ही या बाळाला जन्म दिल्यानंतर माझ्या परिचयातील इच्छुक पालकांना दत्तक देऊ शकतात. त्या मोबदल्यात ते पालक तुमचा सर्व रुग्णालयाचा खर्च आणि तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अर्थ साहाय्य करतील असे सांगितले. कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्याने अंध दाम्पत्याने त्यास संमती दिली. मात्र मागील महिन्यात प्रसुती झाल्यानंतर अंध दाम्पत्याशी संवाद न साधता ते बाळ डॉक्टर धोनीने छत्तीसगड येथील कौर नामक दाम्पत्याला थेट देऊन टाकले. यानंतर संबंधित अंध दाम्पत्याने अर्थ साहाय्य आणि रुग्णालयाच्या खर्चाविषयी विचारणा केली असता डॉक्टरने ते देण्यास साफ नकार दिला. यामुळे आमचे बाळ आम्हाला परत द्या, आम्ही त्याचा सांभाळ करू असे सांगितले. मात्र डॉक्टरने बाळ देण्यासह नकार दिला.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद

हा संपूर्ण प्रकार अंध दाम्पत्याच्या शेजारील कुटुंबाला कळला असता त्यांच्या मदतीने एक ते दोन आठ्वड्यांनी बाळ पुन्हा अंध आई वडिलांच्या ताब्यात घेण्यात आले. यानंतर जिल्हा महिला बाल विकास विभागाला हा प्रकार कळताच त्यांनी हस्तक्षेप करून डॉक्टर विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर अनुराग धोनी विरुद्ध बेकायदेशीररित्या बाळ दत्तक प्रक्रिया राबविल्याबद्दल खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तर त्याने याआधीही अशाच पद्धतीने काही जणांची फसवणूक केल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत निळजे लोढा हेवनमधील फेरीवाल्यांना नागरिकांनी हटवले

या अंध दाम्पत्याची फसवणूक केल्यानंतर डॉक्टर अनुराग धोनी याने प्रसूतीनंतर संबंधित अंध महिलेला स्तनपान बंद होण्याच्या अर्थातच दूध बंद होण्याच्या गोळ्या दिल्या असल्याचाही धक्कादायक प्रकार तपासादरम्यान समोर आला आहे. यामुळे अशा पद्धतीचे अतिशय धक्कादायक आणि निंदनीय कृत्य करणाऱ्या डॉक्टर विरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केला जात असल्याची माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली आहे.