डोंबिवली – शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा २५ वर्षाचा अनुभव असलेल्या डोंबिवलीतील संत नामदेव पथ परिसरात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची दोन जणांनी ऑनलाईन माध्यमातून ३१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आम्ही तुम्हाला कमी कालावधीत अधिकचा नफा शेअर मार्केट गुंतवणुकीतून मिळवून देतो, असे आमिष दाखवून दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्ताकडून गेल्या वर्षी तीन महिन्यात ३१ लाख ९० हजार रुपये उकळले. सेवानिवृत्ताने नफ्याची रक्कम परत देण्याची मागणी केली. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.
६७ वर्षाचे हे सेवानिवृत्त आपल्या कुटुंबीयांसह डोंबिवली पूर्वेतील संत नामदेव पथ भागात राहतात. ऑक्टोबर २०२४ ते डिसेंंबर २४ या कालावधीत ही फसवणूक झाली आहे. मागील २५ वर्षापासून हे सेवानिवृत्त शेअर मार्केट गुंतवणुकीच्या माध्यमातून उलाढाल करतात. त्यांना या गुंतवणुकीचे चांगले ज्ञान आहे, असे टिळकनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. या फसवणूक प्रकरणी सेवानिवृत्ताने पहिली राष्ट्रीय सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार केली. त्यानंंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
हेही वाचा – कल्याणमध्ये घरात पेस्ट कंट्रोलसाठी आलेल्या कामगाराने केली चोरी
फसवणूक झालेल्या सेवानिवृत्ताने टिळकनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपण ऑ्नलाईन माध्यमातून शेअर गुंतवणुकीतून अधिकचा नफा कोठे मिळतो अशा जाहिराती तपासत होतो. त्यावेळी आपणास शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवा, अशी जाहिरात पाहण्यास मिळाली. आपण त्या जाहिरातीवरील कळ दाबताच एका इसमाने सेवानिवृत्ताला शेअर मार्केटमध्ये सध्या बाजाराची काय परिस्थिती आहे याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवृताला गुंतवणुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. सेवानिवृत्ताचा विश्वास संपादन करून दोन्ही अज्ञातांनी सेवानिवृत्ताला आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला कमी कालावधीत परतावा मिळवून देतो असे सांगून टप्प्याने गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
आपण योग्यरितीने गुंतवणूक करत आहोत, याची सुरुवातीला सेवानिवृत्ताला खात्री पटली. त्यांचे उपयोजन सेवानिवृत्ताने आपल्याकडे स्थापित करून घेतले होते. आपल्या गुंतवणुकीची अचूक माहिती त्यांना मिळत होती. ३१ लाख ९० हजाराची गुंतवणूक केल्यावर सेवानिवृत्ताला उपयोजनवर आपणास एक कोटी ३४ हजाराचा नफा मिळाल्याचे दिसत होते. या रकमेतील काही रक्कम काढण्यासाठी सेवानिवृत्ताने अज्ञातांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांना तुम्हाला नफ्याची रक्कम काढायची असेल तर १५ टक्के रक्कम म्हणजे १० लाख २६ हजार आपणास पहिले भरावी लागेल, असे सांगण्यात आले.
सेवानिवृत्ताला आपली फसवणूक झाल्याचे समजले. आपली मूळ आणि नफ्याची रक्कम मिळण्याची शक्यता नसल्याने सेवानिवृत्ताने राष्ट्रीय सायबर संकेतस्थळावर तक्रार नोंदवली. त्यानंतर टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टिळकनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.