कल्याण : कल्याण मधील एका नोकरदाराच्या क्रेडीट कार्डचा ऑनलाईन वापर करुन अज्ञात भामट्याने गेल्या महिन्यात रात्रीच्या वेळेत चार वेगळ्या व्यवहारांमधून एक लाख ९३ हजार रुपयांची रक्कम नोकरदाराच्या बँक खात्या मधून आपल्या खात्यात वळती करुन फसवणूक केली.आपण कोणाला धनादेश, क्रेडीट कार्ड दिले नसताना अचानक आपल्या बँक खात्यामधून अन्य दोन खात्यांमध्ये रक्कम वळती झाल्याने नोकरदार अमित घाडगे (४३, रा. मंगला सोसायटी, वाडेघर, कल्याण) यांना संशय आला. त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना ऑनलाईन व्यवहारात आपली भामट्याने फसवणूक केली असल्याचे लक्षात आले.
अमित यांच्या ॲक्सिस बँकेच्या क्रेडीट कार्डाचा भामट्याने व्यवहारासाठी वापर केला. दोन दिवसात रात्री बारा वाजल्यानंतर भामट्याने हे व्यवहार केले.क्रेडीट कार्ड द्वारे भामट्याने प्रथम ९७,९९५ रुपये, ३४ हजार, १९ हजार, ४१ हजार रुपये काढून घेतले. तसे लघुसंदेश अमित यांना प्राप्त झाले. त्यांनी तात्काळ आपल्या बँकेला कळवून पुढील व्यवहार थांबविण्याच्या सूचना केला. त्यामुळे त्यांची मोठी फसवणूक टळली. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी अमित घाडगे यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.