कल्याण – देशाच्या विविध भागात एका बनावट पर्यटन कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी निघालेल्या डोंबिवली, कल्याणमधील तीन महिलांची एक लाख २० हजार रुपयांची पर्यटन कंपनीच्या प्रवर्तकांनी फसवणूक केली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागातील राॅयल रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या जयश्री देशपांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विद्या देशमुख, जया छेडा या ज्येष्ठ नागरिक महिलांची फसवणूक झाली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार देशपांडे आणि त्यांच्या मैत्रिणींनी देशाच्या आसाम, गुहावटी, मणिपूर, इम्फाळ, त्रिपुरा भागात पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी फेसबुकवर दिसणाऱ्या एक पर्यटन कंपनीतील धारक हरिश सिंग यांच्याशी संपर्क साधला. आपण संपर्क साधत असणारी पर्यटन कंपनी बनावट आहे हे त्यांच्या निदर्शनास आले नाही. सिंग याने या महिलांना आपण तुम्हाला इच्छित स्थळाची विमानाची तिकीट काढून देतो असे आश्वस्त केले. त्यांच्याकडून ऑनलाइन माध्यमातून प्रत्येकी ४० हजार रुपये उकळले. या महिलांना तुमची तिकिटे तुम्हाला विमानतळावर आल्यावर मी देतो असे आश्वासन बनावट पर्यटन कंपनीच्या प्रवर्तकाने दिले.
हेही वाचा – डोंबिवली, कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यांवर मालवाहू डम्पर चालक भरधाव वेगात
एक महिन्यापासून पर्यटनासाठी निघालेल्या मैत्रिणी तिकीट नोंदणीच्या गडबडीत होत्या. २४ मार्च हा पर्यटनासाठी निघण्याचा दिवस होता. देशपांडे यांनी सिंग यांना आमची तिकिटे आगाऊ पाठवून द्या, अशी मागणी केली. त्यावेळी भामटा सिंग याने तुम्ही विमानतळावर आल्यावर दोन तास अगोदर तुम्हाला तिकिटे मिळतील, असे सांगितले. ठरल्या दिवशी तिघीजणी मुंबई विमानतळावर पोहोचल्या. आता आपणास विमानाची तिकिटे मिळतील आपला पर्यटन प्रवास सुरू होईल या आनंदात तिघीजणी होत्या. विमान प्रवासाची वेळ जवळ आली तरी पर्यटन कंपनीचा सिंग आपणास तिकिटे पाठवित नाही. त्याला संपर्क केला तर त्याचा मोबाईल फोन बंद येऊ लागला. बराच वेळ विमानतळावर वाट पाहूनही सिंग संपर्क करत नाही हे लक्षात आल्यावर आपली सिंग यांनी फसवणूक केल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. पर्यटन कंपनीने आपली फसवणूक केल्याने टिळकनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. जी. पिठे तपास करत आहेत.