कल्याण : शहरात दोन वेगळ्या घटनांमध्ये वेगळी कारणे सांगून भामट्यांनी दोन महिला, पुरूष ज्येष्ठ नागरिकांना लुटले. या ज्येष्ठांकडील ४५ हजाराचा ऐवज भामट्यांनी लुटून पसार झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, मधुकर यशवंत पेडणेकर (७०) हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते कल्याण पूर्वेतील लोकग्राम भागात राहतात. गेल्या आठवड्यात त्यांनी स्टेट बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढले. पैसे काढून बाहेर आल्यावर एक भामटा त्यांना भेटला. त्याने काका तुम्ही एटीएम मधील व्यवहार रद्द केलेला नाही. तो रद्द करण्यासाठी तुमचे एटीएम कार्ड द्या, असे सांगून मधुकर यांच्याकडील एटीएम कार्ड काढून घेतले.
व्यवहार रद्द केल्याचे निमित्त करून जवळील बनावट एटीएम कार्ड मधुकर यांना दिले. त्यांचे खरे कार्ड स्वतः जवळ घेतले. मधुकर यांनी एटीएममध्ये व्यवहार करताना भामट्याने गुप्त संकेतांक पाहिला. मधुकर यांची पाठ फिरताच त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यामधील २४ हजार रूपये काढून घेतले. घरी गेल्यानंतर मधुकर यांना आपल्या बँक खात्यामधून पैसे काढल्याचे दोन लघुसंदेश मोबाईलवर आले. आपण २४ हजार रूपये काढले नाहीत तरी पैसे कसे काढले गेले.
हेही वाचा…टिटवाळ्यात ९० जोते भुईसपाट, बेकायदा चाळी उभारणीसाठी जोत्यांची उभारणी
म्हणून तक्रारदाराने बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांना भामट्याने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ती रक्कम काढली आहे. मधुकर यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत मनुबाई ठाकरे (६०) या महिलेची वाडेघर सर्कल भागात दोन भामट्यांनी २० हजार रूपयांची फसवणूक केली. मनुबाई गुरुवारी वाडेघर भागातून जात असताना दोन भामटे त्यांना रस्त्यात भेटले. आमच्या मालकाला मुलगा झाला आहे. त्याने गरीब लोकांना दान करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही तुम्हाला पण महागडी भेट वस्तू मिळवून देतो असे तक्रारदाराला सांगितले. मनुबाईंना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास सांगून ते पिशवीत ठेवण्यास सांगितले. ती पिशवी भामट्यांनी हिसकावून पळ काढला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.