लोकसत्ता प्रतिनिधी
अंबरनाथ: अंबरनाथच्या अतिरिक्त अंबरनाथ आनंदनगर औद्योगिक वसाहतीत आता डायलेसिस केंद्र सुरू होणार आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इस्ट चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विजय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात हे केंद्र सुरू केले जाणार असून शनिवार, ३ जूनला याचे लोकार्पण होईल. या रूग्णालयात अल्प उत्पन्न गटातील रूग्णांना विनामुल्य सुविधा मिळणार आहे.
अंबरनाथ, बदलापूर या परिसरातील रूग्णांसाठी शहरामध्ये डायलेसिस यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. यात रूग्णाला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी अंबरनाथमध्ये ही सुविधा असावी अशी मागणी होती. रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य उद्योजक सुरेश गुप्ता यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ कंपनीचा सीएसआर निधी या प्रकल्पासाठी दिला. तर बाकी रक्कम रोटरीच्या जिल्हा निधीतून उपलब्ध करून देण्यात आली. यातून तीन यंत्रे उपलब्ध झाली. ही यंत्रे अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगित वसाहतीतील विजय रूग्णालयात ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा… डोंबिवली एमआयडीसीतील सिस्टर निवेदिता शाळा रस्त्यावरील पथदिवे बंद
भविष्यात रुग्णालय आणखी तीन यंत्रे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती रोटरीचे देवराम घागरे यांनी दिली. त्यामुळे आता अंबरनाथ शहरात रूग्णांसाठी डायलेसिस केंद्र सुरू होणार असल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे. अल्प उत्पन्न गटातील रूग्णांना ही सेवा विनामुल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर सर्वसाधारण गटातील रूग्णांकडून माफक शुल्क आकारले जाणार आहे. तर प्रत्येक दिवशी नऊ रूग्णांना सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.