लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शंकर महादेवन ॲकेडमीतर्फे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत संगीत शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांमध्ये गायनाची कौशल्ये असतात, पण त्यांना कौटुंबिक परिस्थिती किंवा अन्य आर्थिक कारणांमुळे योग्य दिशा, मार्गदर्शन मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांचा विचार करुन हा उपक्रम हाती घेतला आहे, असे टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. संदीप घरत यांनी सांगितले.
प्रेरणादायी भारतीय प्रकल्प केंद्र नावाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्व प्रकारचे संगीत शिक्षण या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना देण्यात येईल, असे या प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. कृष्णन शिवरमकृष्णन यांनी सांगितले. या कार्यक्रमाला शंकर महादेवन ॲकेडमीचे विश्वस्त राजेंद्र प्रधान, पंडित मुकुंद मराठे, संस्था विश्वस्त श्रीकांत पावगी, आशीर्वाद बोंद्रे, अर्चना जोशी उपस्थित होते. पंडित मुकुंद मराठे यांनी विद्यार्थ्यांकडून बंदिशी गाऊन घेऊन अभिनव पध्दतीने या उपक्रमाचे उद्घाटन केले. कोणतीही अपेक्षा न ठेवता संगीत शिक्षणाचा अभ्यास करणे म्हणजे संगीत साधना, असे पं. मराठे यांनी सांगितले.
हेही वाचा… डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यांवरुन रिक्षा चालकांची निदर्शने
जगाच्या कोणत्याही भागात गेलो तरी संगीत हे आपल्याला तेथील समाज, संस्कृतीशी जोडून घेते. त्यामुळे इतर अभ्यासा बरोबर संगीत शिक्षणही अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीर टिळकनगर संस्था आणि शंकर महादेवन ॲकेडमीने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे, असे अध्यक्ष डाॅ. घरत म्हणाले. लोकमान्य गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन सादर केली.