भगवान मंडलिक
डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील स. वा. शाळेजवळ कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे ठाकुर्ली उड्डाण पूल, ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक (९० फुटी रस्ता) उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे गुरुमंदिर रस्त्यावरील सुमारे ५०० ते ६०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाखाली दुचाकी, चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहने आणून उभी करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेला कोणतेही शुल्क न भरता महत्वाचा रस्ता वाहन मालकांकडून बंदिस्त केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुलाखालील रस्त्यावर वाहन मालक मालकी हक्काप्रमाणे वाहने उभी करत आहेत. पालिका त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न आकारता अशा वाहन मालकांना मुख्य रस्त्यावरील पुलाखाली वाहने उभी करण्यास कशी देते, असे प्रश्न शहरातील जागरूक रहिवाशांकडून उपस्थित केले जात आहेत. ठाकुर्ली पुलावरून थेट ९० फुटी रस्त्यावर जाण्यासाठी पुलाचे काम पालिकेकडून सुरू आहे. या पुलाचे ठाकुर्ली रेल्वे फाटकाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलाच्या आधार खांबांखाली २० ते २५ फुटांचे एकूण १७ गाळे तयार झाले आहेत.
या १७ गाळ्यांच्या मध्ये सुमारे ८५ चारचाकी आणि सुमारे २०० दुचाकी वाहने उभी राहू शकतात. ठाकुर्ली आणि डोंबिवली रेल्वे स्थानका लगत पुलाचा भाग येतो. त्यामुळे नोकरदारांना याठिकाणी वाहने उभी करून ठाकुर्ली किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकातून नोकरीच्या ठिकाणचा प्रवास करणे शक्य आहे. शहराच्या विविध भागातील वाहन मालक सोसायटीत वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने आपली वाहने पुलाखालील मोकळ्या जागेत आणून उभी करत आहेत.
पालिकेच्या मोक्याच्या जागेचा वापर वाहन मालक फुकट करत आहेत याची कोणतीही माहिती पालिकेच्या मालमत्ता विभाग, फ प्रभाग साहाय्यक आयुक्त, डोंबिवली विभागीय उपायुक्तांना नसल्याचे कळते.
पुलाखाली वाहने उभी करण्यासाठी पालिकेने वाहन चालकांकडून शुल्क आकारणी सुरू केली तर दरमहा पालिकेला महसूल मिळेल. नागरिकांची या भागात वाहने उभी करण्यासाठी अधिकृत सोय होईल. डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात वाहनतळाची सुविधा नसल्याने नोकरदरांना रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर सम, विषम तारखेप्रमाणे वाहने उभी करावी लागतात.
ठाकुर्ली पुलाखाली वाहनतळासाठी मोकळी जागा आहे. हे माहिती नाही. परंतु, याठिकाणी वाहनतळ होऊ शकते. याची प्रथम पाहणी केली जाईल. त्यानंतर यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.
- पल्लवी भागवत उपायुक्त मालमत्ता विभाग
ठाकुर्ली पुलाखाली मोकळ्या जागेत वाहनतळासाठी पालिकेला जागा उपलब्ध होऊ शकते याची पाहणी करून निर्णय घेतला जाईल.
- स्वाती देशपांडे, विभागीय उपायुक्त डोंबिवली