कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेतील एक अतिरिक्त आयुक्त आणि सात उपायुक्तांच्या सुरक्षा रक्षकांना सकाळपासून ते संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपेपर्यंत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तैनातीसाठी (बंदोबस्त) दालनाबाहेर दिवसभर बसून रहावे लागते. आता यापूर्वीसारखे पाण्याचे, अन्य कारणांसाठी नागरिकांचे मोर्चे, घुसखोरी सारखे प्रकार पालिकेत होत नाहीत. त्यामुळे या आठही अधिकाऱ्यांच्या तैनातीमधील सुरक्षा रक्षकांना दिवसभर कोणतेही काम नसल्याने त्यांना प्रशासन बैठा पगार देत असल्याची मते नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.
पालिकांचे मुख्याधिकारी सुरक्षा रक्षक न घेता शहरातील विविध भागात आपल्या शिपाई आणि सहकारी अधिकाऱ्यांसह फिरत असतात. मग कल्याण डोंबिवली पालिकेतील अतिरिक्त आयुक्त, सात उपायुक्तांना सुरक्षा रक्षकाची गरज कशासाठी, असे प्रश्न जाणकार नागरिक, काही समर्पित भावाच्या पालिका कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केले जात आहेत. या आठ सुरक्षा रक्षकांना दरमहा ६० ते ७० हजार वेतनाप्रमाणे दरमहा सहा ते सात लाख रुपये खर्च करते. पालिकेच्या अनेक मालमत्ता, रुग्णालये, स्मशानभूमी, केडीएमटी आगार, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे (बीएसयुपी) येथे सुरक्षा रक्षकांची गरज आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली पश्चिममध्ये नऊ तास वीजपुरवठा बंद
या कामांसाठी पालिकेला बाह्य स्त्रोतामधून सुरक्षा रक्षक घ्यावे लागतात. पालिका सेवेतील उपायुक्तांच्या तैनाती मधील आठ सुरक्षा रक्षकांना अशा कामांसाठी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्तांच्या तैनातीमधील बहुतांशी सुरक्षा रक्षक उमदे, तगडे आहेत. त्यांना दिवसभर बसून ठेऊन प्रशासन त्यांची क्रयशक्ती कमी करत असल्याची मते व्यक्त केली जात आहेत. अतिरिक्त आयुक्तांसह सातही उपायुक्त दिवसभर पालिका मुख्यालयात असतात. क्षेत्रिय कामासाठी त्यांना क्वचित प्रसंगी बाहेर पडावे लागते. बाहेर जाण्याची वेळ आली तर संबंधित उपायुक्तांनी तातडीने सुरक्षा विभागाला संपर्क साधुन एक सुरक्षा रक्षक तैनातीची मागणी करावी. म्हणजे एकाच वेळी पालिकेची दोन्ही कामे साधली जातील, अशी मते जाणकार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहेत.
आयुक्तांचा दौरा असेल तरच काही उपायुक्त रस्त्यावर उतरतात. त्यामुळे दिवसभर दालनाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात ठेऊन संबंधित अधिकारी काय साध्य करतात. आता पालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारापासून ते अंतर्गत चलत मार्गिकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आता शहरात पाणी टंचाई, कचरा किंवा इतर कोणत्याही उग्र समस्या नाहीत. कोणत्याही मोठ्या आंदोलनाची किंवा कोणा उपायुक्ताला लक्ष्य करण्याची आता परिस्थिती नाही. तरीही संबंधित उपायुक्त सुरक्षा रक्षकाच्या गराड्यात फिरत असतील तर त्यांनी स्वताहून मनाचा मोठेपणा करुन आपल्या तैनातीमधील सुरक्षा रक्षक प्रशासनाला इतर कामांसाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा >>> ठाण्यात वाहन थकीत दंड वसुलीसाठी लोकअदालत; दंडाची रक्कम होणार कमी
उपायुक्तांच्या दालनातून आयुक्तांच्या दालनापर्यंत, उद्वाहनाचे दार उघडण्यासाठी, कार्यक्रमात साहेबांच्या सत्काराचा शाळ, नारळ स्वीकारणे आणि शिवाजी चौकात किंंवा अन्य ठिकाणी साहेबाचे वाहन कोंडीत अडकले तर खाली उतरुन ती सुरळीत करुन साहेबाचे वाहन पुढे काढण्याचे काम आता उपायुक्तांच्या तैनाती मधील सुरक्षा रक्षक करत असल्याची माहिती मिळते. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्वच उपायुक्तांच्या तैनातीमधील सुरक्षा रक्षकांचा आढावा घेऊन त्यांना अन्यत्र नेमणुका देण्याची मागणी जाणकार नागरिकांकडून केली जात आहे.