ठाणे – श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नव वर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे आहे. यानिमित्त न्यासाकडून महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील एक म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून न्यासाने खास महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित केले आहे. रविवार, ९ मार्च रोजी तीन हात नाका येथील इटरनिटी मॉलमध्ये या चित्रपटाचे प्रक्षेपण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे असल्यामुळे यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष करुन तरुणांचा सहभाग वाढविण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्वागत यात्रेची तयारी देखील आयोजकांनी चार महिन्या आधीपासून सुरु केली आहे. जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजक शहरातील महाविद्यालयांशी समन्वय साधत आहेत. महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचे आयोजन करत आहेत. तसेच युवा दिना निमित्त न्यासाकडून युवा दौडचे आयोजन देखील करण्यात आले होते. या युवादौडमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. आता, महिला दिनाचे औचित्य साधून न्यासाने खास विद्यार्थिनींसाठी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित केले आहे. आजच्या पिढीला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजावा या उद्देशाने मोफत प्रक्षेपण आयोजित केले असल्याचे न्यासाकडून सांगण्यात आले. ठाणे शहरातील समर्थ भारत व्यासपीठ अभ्यासिकेतील तसेच ज्ञानसाधना, केबीपी, ठाकूर आणि आनंद विश्व गुरुकुल अशा महाविद्यालयातील प्रत्येकी ५० विद्यार्थिनींना हा चित्रपट पाहता येणार आहे, अशी माहिती न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी दिली.

ठाण्यातील तीन हात नाका जवळील इटरनिटी मॉलमध्ये रविवार, ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता याचित्रपटाचे पहिले प्रक्षेपण होईल. त्यानंतर, दुसरे प्रक्षेपण होणार आहे. प्रत्येक प्रक्षेपणाला वेगवेगळ्या विद्यार्थिनी असणार आहेत. त्यासह, छावा चित्रपटातील कलाकारांना तलवारबाजी आणि युद्धकौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रणय शेलार यांचा प्रक्षेपणावेळी सत्कार केला जाणार आहे. तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचाही यावेळी मेजर मोहिनी कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली.

विविध कार्यक्रमांची रेलचेल

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात बुधवार, १२ मार्च रोजी ‘भारत २०४७- युवकांचा सहभाग’ याविषयावर व्याख्याते दिपक करंजीकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर, शनिवार, २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वजाता श्री कौपिनेश्वर मंदिर प्रांगणात नृत्यधारा हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ठाण्यातील विविध नृत्य संस्थांचे सादरीकरण असणार आहे. तर, रविवार, २३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता भव्य सांगितीक कार्यक्रम होणार आहे. तर, यंदा वाराणसी येथील पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. शुक्रवार, २८ मार्च रोजी उपवन येथे तर, शनिवार, २९ मार्च रोजी मासुंदा तलाव येथे ही गंगा आरती होणार आहे. मासुंदा तलाव येथे होणाऱ्या गंगा आरतीसह दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव देखील होणार आहे.