उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका प्रशासनाने आपल्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत वाढ करण्याचे संकेत दिले असतानाच शहरात भीषण पाणी टंचाई उद्भवली. देखभाल दुरूस्तीच्या कामाने त्यात भर पडली. त्यातून उल्हासनगर शहरातील नागरिक सावरत नाही तोच आता महापालिका प्रशासनाने टंचाईग्रस्त नागरिकांना दिले जाणारे मोफत टँकर सशुल्क केले आहे. त्याचे दरपत्रकच पालिका प्रशासनाने जाहीर केले असून पाणी नळाने न मिळाल्यास आता विकत पाणी घेण्याची वेळ उल्हासनगरकरांवर येणार आहे.

उल्हासनगर महापालिकेला स्वतःचा पाण्याचा स्त्रोत नाही. त्यामुळे उल्हासनगर महापालिका महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी घेत असते. त्याचेही मोठी थकबाकी पालिका प्रशासनाकडे आहे. त्यातच यंदाच्या अर्थसंकल्पात उल्हासनगर महापालिकेने पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही वाढ अल्प असली तरी पालिकेच्या तिजोरीत घसघशीत वाढ होणार आहे. त्यामुळे उल्हासनगर शहरात करदात्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे एकीकडे उल्हासनगर महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे उल्हासनगर शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरच्या विविध भागात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिक जलकुंभाजवळ जमून आंदोलन करत असल्याचेही चित्र काही दिवसांपूर्वी पहायला मिळाले होते. याच काळात देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी उल्हासनगर शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात वाढ झाली होती. ज्या भागात पाणी पुरवठा कमी दाबाने अथवा होत नव्हता त्या भागात उल्हासनगर महापालिका स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवत होती. मात्र आता हे मोफत टँकर बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

आता यापुढे उल्हासनगर वासियांना घरी नळाला पाणी न आल्यास पाणी विकत घेण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने टँकरचे दरच जाहीर केले आहेत. १ एप्रिलपासून या दरांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार आता ७ हजार लीटरसाठी ७५० रूपये मोजावे लागणार आहेत. तर १० हजार लीटरच्या टँकरसाठी १ हजार रूपये द्यावे लागतील. त्याचवेळी ७ हजार लीटर क्षमतेच्या टँकरमध्ये पाणी भरून देण्यासाठी ३०० तर १० हजार लीटरचा टँकर भरण्यासाठी ३५० रूपये घेतले जातील. मात्र नागरिकांना त्याचा फायदा होणार नाही. नागरिकांना टँकरसह पाणी घ्यावे लागणार आहे. पालिका प्रशासनाने पाण्याचा गैरवापर टाळत पाणी जपून वापराण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पालिकेच्या या निर्णयांवर आता नागरिक आणि राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत असल्याचे कळते आहे.