पालघर जिल्ह्यातील २२५ सेविका, मदतनीसांच्या भरतीला मान्यता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत २२५ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेचा मार्ग खुला झाला आहे. शासनाने या भरती प्रक्रियेला परवानगी दिल्यामुळे आता रिक्त असलेली पदे १ नोव्हेंबरपासून भरली जाणार आहेत. या पदांना मंजुरी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाला बळ मिळणार आहे. कुपोषण निर्मूलन कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोठा सहभाग असतो.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राबवण्यात येणारे विविध उपक्रम केंद्र शासनामार्फत खंडित करण्यात आले होते. अंगणवाडय़ांची संख्या निश्चित होईपर्यंत त्यांच्या सेविकांची पदे न भरण्यासाठी अर्थ विभागाने शासनास याआधी सूचना दिल्या होत्या. मात्र जिल्ह्यत कुपोषणाचे प्रमाण आणि अंगणवाडीची गरज लक्षात घेता ही पदे भरणे महत्त्वाचे असल्याचे तसेच आता कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर रिक्त अंगणवाडय़ांचा अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे कामाचा व्याप वाढत असून त्यांचा थेट परिणाम या बालकांवर होत आहे.

अंगणवाडी सेवांवर होणारा परिणाम, रिक्त अंगणवाडी सेविकांची- मदतनीसांची पदे या संदर्भात अनेक संघटनांनी मोर्चे काढले होते. जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची २२५ पदे रिक्त असल्याने त्याचा अंगणवाडी सेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. ही पदे भरण्यासाठी त्यांनी महिला व बालविकास विभागाच्या सचिव यांच्याकडे मागणी केली. त्याअनुषंगाने शासनाने यावर विचार करत पालघर जिल्ह्यसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यंत राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गतच्या रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे.

पालघर जिल्ह्यासह नंदुरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशिंद, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, धारणी, चिखलदरा या भागातही अंगणवाडीसेविकांची रिक्त पदे १ नोव्हेंबरपासून भरण्यात येणार आहेत, असे राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free the way for the recruitment of aanganwadi sevikas
Show comments