नागरिकांना मोफत वायफाय सुविधा; महापालिकेचा प्रस्ताव
इंटरनेट, वायफाय हे आजच्या पिढीचे परवलीचे शब्द बनले आहेत. इंटरनेट वाचून तर तरुणाईचे पावलोपावली अडत असते. काळाची ही गरज ओळखून मीरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी वायफाय यंत्रणा उभारण्यात येणार असून नागरिकांसह महापालिकेच्या सर्व कार्यालयांनाही याद्वारे मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही सुविधा उपलब्ध करून देण्यासा़ठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही.
मीरा-भाईंदर महापालिकेचा समावेश ‘स्मार्ट सिटी योजने’त झाला नसला तरी शहर स्मार्ट वनविण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. डिजिटल इंडियाचा एक भाग म्हणून नागरिकांना इंटरनेट व वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच महापालिका कार्यालयांमधून वायफाय यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणांद्वारे महत्त्वाच्या ठिकाणी एक एमबीपीएस व शहरातील इतर ठिकाणी नागरिकांसाठी ५१२ केबीपीएस या गतीची वायफाय सुविधा मोफत मिळणार आहे. यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर चार वर्षांनंतर शहरात सर्वत्र एक एमबीपीएस गतीची वायफाय सुविधा मिळणार आहे. याकरता नागरिकांना त्यांची नावे यंत्रणेच्या प्रणालीत एकदाच नोंदवावी लागणार आहेत व त्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. मात्र मोफत मिळणाऱ्या इंटरनेट वायफाय सुविधेव्यतिरिक्त जास्त गतीचे इंटरनेट हवे असेल तर नागरिकांना ठेकेदाराने नक्की केलेल्या योजनेनुसार पैसे आकारण्यात येणार आहेत.
यंत्रणा उभारण्यासाठी येणारा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदार करणार असून महापालिकेला त्यासाठी एक पैसाही खर्च करावा लागणार नाही. उलटपक्षी ठेकेदार जो व्यवसाय करेल त्यातील ठरावीक हिस्सा महापालिकेला मिळणार आहे. याव्यतिरिक्त शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात महत्त्वाच्या ठिकाणी ४२ अशा सहा प्रभागांत मिळून २५२ शक्तिशाली व नाइट व्हिजन क्षमता असणारे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. यासाठी इंटरनेटसह सर्व खर्च करण्याची जबाबदारी ठेकेदारावरच टाकण्यात येणार आहे. इंटरनेट वायफाय तसेच सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल, निगा, दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांची नेमणूक ठेकेदारानेच करायची असून मीरा-भाईंदर महानगरपालिका ठेकेदाराला केवळ जागा उपलब्ध करून देणार आहे. ठाण्यातल्या इंटेकऑनलाइन प्रा. लि. या कंपनीने यासंदर्भातला प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर केला असून प्रशासन इतर कंपन्यांकडूनही प्रस्ताव मागवणार आहे. यासाठी हा प्रस्ताव लवकरच महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा