११ कंपन्या सरसावल्या; ऑनलाइन निविदा मागविण्याच्या हालचाली
ठाणे, कळवा ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांमध्ये येत्या मार्च अखेपर्यंत मोफत ‘वाय-फाय’ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या योजनेसाठी सुमारे अकरा बडय़ा नामांकित कंपन्या पुढे आल्या असून त्यांनी ही योजना राबविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने या योजनेसाठी आता ऑनलाइन निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्षात योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचा विचार आहे. यामुळे येत्या मार्च अखेपर्यंत ठाणेकरांना ‘वायफाय’ सेवा मिळण्याची शक्यता आहे.
येत्या सहा महिन्यांत संपूर्ण ठाणे शहर ‘वाय-फाय’ युक्त करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी ठाणे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. या घोषणेनुसार ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही योजना प्रत्यक्षात राबविण्यासाठी एक सविस्तर प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार ठाणे, कळवा, मुंब्रा या तिन्ही शहरातील सुमारे चारशे खांबांवर वायफाय यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. याशिवाय, याच खांबांवर संबंधित कंपनीला ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तसेच महापालिकेची विविध कार्यालये सीसीटीव्ही यंत्रणांना जोडण्याची आवश्यक सुविधा पुरविण्याचे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामधून मिळणाऱ्या उत्पन्नातील दहा टक्के हिस्सा पालिकेला मिळणार आहे.
वायफाय योजनेसंबंधी असलेल्या अशा स्वरूपाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेनेही नुकतीच मान्यता दिल्याने प्रशासनाने ही योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या योजनेसाठी सुमारे अकरा बडय़ा नामांकित कंपन्या पुढे आल्या असून त्यात काही मोबाइल कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला असून त्यामध्ये ही योजना राबविण्याची तयारी कंपन्यांनी दर्शविली आहे. कंपन्यांच्या प्रतिसादानंतर महापालिका प्रशासनाने आता योजनेसाठी ऑनलाइन निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या महिनाभरात संपूर्ण निविदा प्रक्रिया उरकण्याचा आणि मार्च अखेपर्यंत शहरामध्ये पहिल्या टप्प्यात ही योजना सुरू करण्याचा विचारही प्रशासनाने सुरू केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिका प्रशासनाकडून ही योजना राबविण्यासाठी सुरू असलेल्या हालचाली पाहता येत्या मार्च अखेपर्यंत शहर ‘वाय-फाय’ युक्त होण्याची शक्यता आहे. याचा फायदा ठाणेकरांना होणार आहे.

१०० रु. भरा, सेवा घ्या!
महापालिकेकडे सुरुवातीला १०० रुपयांच्या नोंदणी शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. त्यानंतरच नागरिकांना या सेवेचा फायदा घेता येणार आहे. या सेवेचा ५१२ केबीपीएस इतका वापर करता येऊ शकतो आणि त्यानंतर वाढीव वापरासाठी पैसे भरावे लागणार आहेत.

Story img Loader