बदलापूरमध्ये वारंवार आगी लागण्याचा प्रकार; वनखात्याचे अधिकारी मूळ कारणापासून अनभिज्ञ

डोंगरावर पेटलेला वणवा दिसला की अनेक जण नयनरम्य दृश्य म्हणून त्याकडे पाहत असतात. मात्र, बदलापूरजवळील टावली व चंदेरी डोंगरांवर गेल्या अनेक दिवसापासून एकाच ठिकाणी वारंवार वणवा पेटल्याचे चित्र दिसत असून यामुळे लागलेल्या आगीत येथील वनसंपदा व जीवसृष्टी संपुष्टात येत असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत. हा वणवा वारंवार का लागतो याचे ठोस कारण अद्यापही स्थानिक वनविभागाकडे नाही. याबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर बोलू, अशी आश्चर्यकारक भूमिका वनविभागाने घेतली आहे. मात्र, बदलापूर एमआयडीसीला कोळसा पुरविण्यासाठी व झाडे जाळून सश्यांसारख्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी हा वणवा पेटवला जात असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.

बदलापूरच्या पूर्वेला शहरालगत असलेल्या डोंगररांगांमधील टावलीचा डोंगर ते चंदेरीचा किल्ला यादरम्यान हिवाळा सुरू झाल्यापासून वणवा पेटत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळी हा वणवा पेटल्याचे दिसत आहे. या वणव्यात ससा, मुंगूस, सरपटणारे प्राणी तसेच पक्ष्यांची घरटी व झाडे आदी वनसंपदा जळून खाक होत आहे. शहरातून लांबून छोटे दिसणाऱ्या या वणव्यांची भीषणता मोठी असल्याचेही दिसून येत आहे. ही आग कशी लागते याचे ठोस उत्तर अद्याप वनविभागाकडे नसून स्थानिक आदिवासींना हाताशी धरून काही जण मोठय़ा प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान करीत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी करू लागले आहेत. हा वणवा नेमका थंडीच्याच दिवसात का पेटतो आणि एकाच ठिकाणी का पेटतो याचा शोध वनविभागाने घेणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत. मात्र, कोळशासाठी व प्राण्यांच्या शिकारीसाठी आदिवासी असे करीत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. तसेच यामागे काही परिसरातील नागरिकांचा हात असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी वनविभागाने कठोर पावले तात्काळ उचलावीत व त्याबद्दल गैरसमज पसरण्याआधी बदलापूर पालिकेला योग्य माहिती सादर करावी, असे पालिकेच्या वृक्ष समितीचे सदस्य व पर्यावरणप्रेमी अशोक सोनावळे यांनी वनविभागाला कळवले आहे.

चंदेरी डोंगरावर वणवा पेटत असल्याच्या घटना आम्हाला समजल्या आहेत. हा वणवा पेटण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आम्ही तेथील परिस्थितीचा आढावा घेत असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. स्थानिक आदिवासी हे झाडापासून मिळणारे डिंक मिळवण्यासाठी झाडे जाळतात त्यातून त्यांना जास्त डिंक मिळतो, असा गैरसमज त्यांच्यात असल्याने असे प्रकार घडत असल्याचे प्रथमदर्शनी वाटते आहे. मात्र यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून वस्तुस्थितीदर्शक अहवाल आल्यावर त्यावर उपाययोजना करण्यात येतील.

चंद्रकांत शेळके, वनअधिकारी, बदलापूर

(((   सायंकाळच्या वेळी डोंगरामध्ये आग लागत आहे.   ))))

Story img Loader