मार्च महिन्यातच उन्हाच्या कडक झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे गारेगार होण्यासाठी रस्त्याने जाता-येता प्रत्येक जण थंडगार पेयाची दुकाने शोधताना दिसत आहे. आपली तहान भागवणाऱ्या थंड पेयांचे चवीलाही नक्कीच महत्त्व असते. या पेयाचा एक घोट प्यायल्यानंतरच ‘वा काय बरे वाटले’ असे म्हणत म्हणतच आपण हे पौष्टिक पेय संपवतो. दुकानातील एखाद्या थंड पेयाची चव आवडली तर सहजपणे वेगवेगळ्या थंडगार पेयांचा आस्वाद आपण घेतो. अशी गारेगार करणारी ही दुकाने भरपूर फळांनी सजवलेली असतात. त्यामुळे ताजी फळे पाहिल्यानंतर या फळांचा रस आपणही प्यावा असे वाटले तर त्यात नवल ते काय?
असेच गारेगार, चविष्ट आणि ताज्या फळांचे रस देणाऱ्या डोंबिवली पूर्व येथील कस्तुरी ज्यूस सेंटरकडे तहानलेल्या डोंबिवलीकरांची पावले वळतात. फळांचा रस ही मुख्य कल्पना खरे तर नैसर्गिकच असावी याचे कारण झाडावरील पशुपक्षीही गोड फळांचा शोध घेतात व त्याचा रस पितात. त्यानंतर राहिलेला फ ळांचा चोथा फेकून देतात. अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यात खवय्ये गारेगार करणारे चविष्ट पेय कुठे मिळेल याचा शोध घेतात आणि त्यांची पावले कस्तुरी ज्यूस सेंटरकडे वळतात. येथे गारेगार करणाऱ्या फळांच्या रसात सुकामेवा, दूध आदी प्रकार वापरून मिल्कशेकही तयार होते. अनेक लहान मुलेही कस्तुरी ज्यूस सेंटरकडे ज्यूस प्यायला जाऊ असा हट्टच धरतात. मात्र हा हट्ट आई-बाबा सहज पूर्ण करताना दिसातात. कारण ग्राहकांना ताज्या फळांचा रस देणे हे या दुकानाचे वैशिष्टय़ आहे. सुरुवातीला लिंबाचे सरबत फारच प्रसिद्ध होते. त्यानंतर संत्र हे एक लिंबू वर्गातीलच फळ असल्याचे माहीत झाले आणि त्यानंतर मध्य आशियात या गारेगार पेय पदार्थाची चव सर्वाच्याच पसंतीला उतरली. कस्तुरी ज्यूस सेंटर या दुकानानेही आपल्या ग्राहकांना ताज्या आणि चांगल्या फळांचा रस प्यायला देऊन आपलेसे केले आहे.
येथे मोसंबी, संत्र, अननस, सफरचंद, द्राक्ष आदी ताज्या फळांचे रस ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यातील डाळिंबाचा रस देताना विशेष काळजी घेऊन रस पिताना बिया येऊ नयेत यासाठी डाळिंबाचे दाणे काढून ते एका स्वच्छ धुतलेल्या कापडात गुंडाळतात आणि त्यानंतर हाताने पिळून त्याचा रस दिला जातो. त्यामुळे येथील डाळिंबाचा रस ग्राहक आवर्जून पितात. विशेषत: किडनी स्टोन असणाऱ्या रुग्णांना आवर्जून हा रस पिण्यासाठी दिला जातो. डाळिंबाच्या या रसामुळे हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. त्यामुळे या दुकानात दिवसाला ५०-६० किलो डाळिंब लागतात. डिसेंबर ते एप्रिल स्ट्रॉबेरी, एप्रिल ते जुलै आंबा आणि जुलै ते डिसेंबर सीताफळ या पेयांचा जास्त खप असतो. या दुकानातील मिल्कशेकही तितकेच प्रसिद्ध आहे. या मिल्कशेकमध्ये आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी, चिकू, रोझ, पिस्ता हे मिल्कशेक प्रसिद्ध आहेत. शिवाय चिकू चॉकलेट मिल्कशेकला ग्राहक आणि तरुण पिढी अधिक पसंती देताना दिसते. यामध्ये चिकूचा गर काढून त्यात थंडगार दूध आणि चॉकलेट्स चिप्स टाकले जाते. हे मिल्कशेक पिताना यम्मी म्हणत आणि जिभल्या चाटतच हे मिल्कशेक प्यायले जाते. काजू अंजीर या मिल्कशेकमध्ये ताजी अंजीर आणि त्यामध्ये अख्खे काजू किंवा काजूची पावडर टाकली जाते. दुकानाचे मालक रमेश शानबाग म्हणाले, काजूची भुकटी टाकली तर त्या मिल्कशेकला छान जाडसरपणा येतो आणि प्यायला आणखी मजा येते. शिवाय काही जण काजू खात नाहीत, त्या वेळी अशा प्रकारची पावडर टाकल्यास काजू न खाणाऱ्यांच्या नकळतच काजू खाल्ले जातात. इलायची केशर या पेयाला इलायची आणि केशराची चव येते. सध्या होळी तोंडावर आली असल्याने थंडाईला ग्राहकअधिक पसंती देताना दिसत आहेत. थंडाईसुद्धा ताज्या दुधातच बनविलेली असते. त्यामुळे ती पोटाला बाधत नसल्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्याकडील ड्रायफ्रुट मिल्कशेक लाही प्रचंड मागणी असते. यामध्ये दूध, सुकामेवा आदी जिन्नस वापरले जातात. गेली दोन दशके हे दुकान डोंबिवलीकरांना थंडगार सेवा देत आहेत. या दुकानातील सगळी फळे ही दररोज सकाळी भायखळा बाजारातून आणली जातात, असेही त्यांनी सांगितले.
* कुठे – कस्तुरी ज्यूस सेंटर, कस्तुरी प्लाझा, डोंबिवली (पू.)
* वेळ- सकाळी ९.३० ते रात्री १०.३० वाजता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा