डोंबिवली- येथील पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी दोन तरुणांनी एका १७ वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर चाकुने वार करुन तिला गंभीर जखमी केले. वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अल्पवयीन तरुणी ड़ोंबिवली पश्चिमेत राहते. ती या भागात सकाळच्या वेळेत इमारतींमधील सफाईचे काम करते.
हेही वाचा >>> डोंबिवलीतील ६९ बेशिस्त रिक्षा चालकांचे परवाने रद्द होणार? चालकांनी थकवली ११ लाखाची दंडाची रक्कम
मंगळवारी सायंकाळी ती गुप्ते रस्त्याने रसवंती गृह भागातून जात होती. त्यावेळी तेथील एका गल्लीतून जात असताना तिला तिच्या ओळखीचा रोशन आणि त्याचा साथीदार भेटला. रोशनने तिच्याशी बोलणे सुरू केले. याचदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून रोशन आणि त्याच्या साथीदाराने तरुणीला घेरुन तिच्यावर चाकूने वार केले. तिला गंभीर जखमी केले. तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे विष्णुनगर पोलीस ठाण्यात रोशन आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.