भेटवस्तू, भेटकार्डाच्या खरेदीकडे तरुण वर्गाची पाठ; मित्रमैत्रिणींसोबत खादाडी करण्याला प्राधान्य
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा मैत्री दिन (फ्रेण्डशिप डे) मित्रमंडळींसाठी संस्मरणीय करण्यासाठी होणारी भेटवस्तू, भेटकार्डाची देवाणघेवाण यंदा काहीशी मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे मैत्री दिन दोन दिवसांवर आला असतानाही बाजारात शुकशुकाट आहे. तरुण वर्गातील मैत्री दिनाचे अप्रूप कमी झाले नसले तरी भेटवस्तू किंवा भेटकार्डे देऊन तो साजरा करण्यापेक्षा मित्रमंडळींसोबत खादाडी करण्यावर भर दिसत आहे.
एकीकडे भेटवस्तूंच्या दुकानांत यंदा गर्दी रोडावली असताना हॉटेल, रेस्टॉरंट तसेच खाद्यपदार्थाच्या ठिकाणी मात्र गर्दी खेचण्यासाठी सवलतींचा वर्षांव केला जात आहे.
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा येणारा ‘विशेष दिन’ म्हणजे मैत्री दिन. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी असला तरी मैत्री दिनाच्या निमित्ताने आठवडाभर आधीपासून तरुण वर्गाचा उत्साह ओसंडून वाहत असतो. यानिमित्ताने मित्रमंडळींना भेटवस्तू किंवा भेटकार्डे देण्याची प्रथाही गेल्या काही वर्षांत रुजली आहे. त्यामुळेच मैत्री दिनाच्या तोंडावर दहा दिवस आधीपासून आकर्षक भेटवस्तू, रंगबिरंगी रिबिणी, भेटकार्डे यांची दुकानांत रेलचेल दिसायची. यंदा मात्र हा बाजार थंडावल्याचे चित्र आहे.
‘गेल्या वर्षीपासून मैत्री दिनाविषयी तरुण वर्गाला वाटणारे अप्रूप कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भेटवस्तूंची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे आम्ही भेटकार्डाखेरीज अन्य वस्तू विक्रीसासाठी आणलेल्या नाहीत,’ अशी माहिती ठाण्यातील दुकानदार हितेश सत्रा यांनी दिली. भेटवस्तूंच्या वाढत्या किमती आणि त्यातील तोचतोचपणा यामुळे तरुण वर्ग या गोष्टींवर खर्च करणे टाळत असल्याचे निरीक्षण आहे. ‘पूर्वी हौस म्हणून दुकानात जाऊन रिबिणी खरेदी करून मित्रमैत्रिणींना बांधायचो. भेटकार्ड द्यायचो. मात्र आता ते फॅड कमी झाले आहे. मैत्री दिनाची उत्सुकता पूर्वीसारखी राहिलेली नाही,’ अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया अंतरा शिंदे या तरुणीने दिली.
एकीकडे, भेटवस्तूंच्या दुकानांत शुकशुकाट असताना हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मैत्री दिनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. एकमेकांना भेटवस्तू देण्यापेक्षा हा दिवस एकत्रितपणे घालवण्याकडे तरुणाईचा ओघ वाढत आहे. साहजिकच अशा वेळी खाण्यापिण्याला महत्त्व दिले जाते. या पाश्र्वभूमीवर रेस्टॉरंट, रेस्टो-बार आणि खाद्यपदार्थाच्या दुकानात खास सवलती देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा ट्रेंड कायम आहे. शहरातील रेस्टॉरंटमध्ये मद्य, शीतपेये, खाद्यपदार्थावर सवलती देण्यात येत आहेत. रविवार ते गुरुवार मद्यपेयांवर सवलती, तसेच हा संपूर्ण ऑगस्ट महिना काही रेस्टॉरंटमध्ये कॉकटेल्स एकावर एक फ्री देण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यातील ‘द रोड हाऊस रेस्टोबार’चे दुर्गेश मिश्रा यांनी दिली.