गळती लागलेल्या जलवाहिन्या आणि रस्त्यांवर येणारे सांडपाणी यामुळे खराब होणारे रस्ते आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचा थेट फटका शहरात धुळ वाढण्याला होता. त्यावर उपाय म्हणून आता उल्हासनगर महापालिकेने शहरातील अशा वर्दळीच्या, कोंडीच्या आणि गर्दीच्या ठिकाणी तुषार फवारणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. गुरूवारी ही दोन यंत्रे सुरू केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. धुलीकण कमी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी ही यंत्रे ठेवली जातील. राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रमात उल्हासनगर शहराचा समावेश झाल्याने पालिकेने ही यंत्रणा खरेदी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर महानगरपालिका शहराची लोकसंख्या ११ वर्षांपूर्वी ५ लाख ६ हजार ९८ इतकी होती. ती आता सुमारे साडे सहा लाख असण्याची शक्यता आहे. अत्यंत दाटीवाटीचे शहर म्हणून उल्हासनगर शहराला ओळखले जाते. व्यापारी शहर असल्याने दररो हजारो ग्राहक आणि व्यापारी शहरात येत असतात. उल्हासनगर शहरामध्ये ३ रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकामधून लाखो प्रवाशांची ये-जा सुरु असते. त्यात शहरात गळती लागलेल्या जलवाहिन्या, फुटलेल्या गटारांमुळे अनेकदा पाणी रस्त्यावर येते. परिणामी रस्ते खराब होऊन खड्डे पडतात. त्यामुळे शहरात धुळ पसरते. तसेच काम सुरू असलेल्या ठिकाणी, कोंडीच्या ठिकाणीही शहरात धुळीचे साम्राज्य दिसते. अशावेळी ही धुळ नियंत्रण करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने मार्च महिन्यात हालचाली सुरू केल्या होत्या. केंद्र शासनाकडून उल्हासनगर शहराचा राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. उल्हासनगर महापालिकेला १५ व्या वित्त आयोगामार्फत १३ कोटी ४६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यामुळे शहरातील हवा प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना कराण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने १५ वित्त आयोगाच्या माध्यमातून दोन तुषार फवारणी यंत्रे विकत घेतली होती. ही यंत्रे गुरूवारपासून पालिका प्रशासनाने कार्यान्वित केली. पालिका मुख्यालयाबाहेर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या उपस्थितीत ही यंत्रे सुरू करण्यात आली. आता शहरातील वर्दळीची, कोंडीच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणातील धुलीकणकमी करण्यासाठी पालिका ही दोन तुषार फवारणी यंत्र (मिस्ट स्प्रेयींग मशिन) असलेली वाहने उभी करेल. फवारणीतून धुलीकण जमीनीवर आणत धुळ कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे.

शहरातील कोंडीच्या, गर्दीच्या ठिकाणी आणि शहरातील ज्या भागात धुळीकण सर्वाधिक आढळतात त्या ठिकाणी ही यंत्रे फिरवली जाणार आहेत. वाहनावर ही यंत्रे असल्याने वाहन शहरात कुठेही फिरवता येणार आहे. या यंत्रामुळे धुलीकण कमी होऊन हवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frost spraying system operational to prevent dust in ulhasnagar amy