कोपर रेल्वे स्थानक आहे की फळबाजार, असा संतप्त सवाल सध्या प्रवाशांकडून विचारला जात आहे. कारण या स्थानकावर फळ विक्रेत्यांनी आक्रमण केले आहे. त्याकडे रेल्वे प्रशासनाचे बिलकूल लक्ष नाही. हे विक्रेते स्थानकावरच कचरा टाकत असल्याने दरुगधी निर्माण होत आहे. त्यांना हटविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
 मध्य रेल्वे मार्गावरील दिवा व डोंबिवलीदरम्यान असणारे कोपर स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, तर रेल्वे प्रशासनालाही लाखो रुपयांचे उत्पन्न येथून प्राप्त होते. दिवा वसई थांब्यामुळे या स्थानकाला जास्त महत्त्व प्राप्त झाले. भरघोस उत्पन्न मिळूनही या स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाने मात्र कायम दुर्लक्ष केले आहे. येथे रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस तर दिसत नाहीतच, शिवाय स्टेशन मास्तरांचेही दर्शन कधी घडत नाही. त्यामुळे फेरिवाल्यांची संख्या दिवसेंदिवस येथे वाढत चालली आहे. रेल्वे स्थानकाच्या बाहेरील फेरीवाल्यांना आत्तापर्यंत नागरिकांना तोंड द्यावे लागत होते. आता मात्र रेल्वे स्थानकातच या फेरिवाल्यांनी बस्तान बसविल्याने आता जाब तरी कोणाला विचारावा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

नारंगी सडा!
कोपर रेल्वे स्थानकात मोठय़ा प्रमाणावर संत्री विक्रेते येत आहेत. दहा रुपयाला पाच संत्रे मिळत असल्याने प्रवाशांचीही ते विकत घेण्यासाठी झुंबड उडताना दिसते. हे विक्रेते संत्री सोलून दिल्यावर त्याची साले रेल्वे रुळावरच टाकत असल्याने तेथे कचऱ्याचा नारंगी सडाच सांडलेला दिसतो, तर प्रवासीही संत्री खाल्यानंतर कचरा स्थानकातच टाकत आहेत. रेल्वे प्रशसन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

सुरक्षा कर्मचारी कुठे आहेत?
गांधी जयंतीदिनी स्वच्छतेची मोहीम सर्वत्र राबविण्यात आली. रेल्वे परिसरही स्वच्छ करण्यात आले. स्थानकात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा रेल्वे प्रशासनाने केली. मात्र प्रशासनाची ही घोषणा आता बंदच झाली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी एक दिवसाआड आम्ही कारवाई करत असल्याचे सांगत असले तरी ती दिसून मात्र येत नाही. रेल्वे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी कोपर परिसराचा  पहाणी दौरा करणार असल्यास असंख्य संख्येने दिसणारे आरपीएफ चे जवान इतर वेळेस मात्र दिसत नाही.
विक्रे ते सांगतात, आम्ही हप्ता देतो तर आमच्यावर कारवाई का करतील, कमाईतला अर्धा पैसा आम्ही त्यांना देतो.

Story img Loader