लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षा वाहनतळाजवळ पादचाऱ्यांच्या येण्याच्या जाण्याच्या वाटेतच एक फळ विक्रेता मागील काही दिवसांपासून व्यवसाय करत आहे. या फळ विक्रेत्याच्या ठेल्यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन रिक्षा वाहनतळावर जावे लागते. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी फळ विक्रेता व्यवसाय करत असुनही ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांना हा फेरीवाला दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून महात्मा फुले रस्त्याच्या दिशेने बाहेर पडणारे प्रवासी रिक्षा वाहनतळावर येण्याच्या वाटेवर फळ विक्रेता मागील काही दिवसांपासून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्याचा ठेला लावतो. रेल्वे स्थानकात जाणारे, बाहेर पडणारे प्रवासी याच भागातून येजा करतात. संध्याकाळच्या वेळेत हा ठेला प्रवाशांच्या वाटेत अडसर येतो.
कल्याण डोंबिवली पालिकेतील दहा प्रभागांमधील मागील दहा वर्षापूर्वी फेरीवाला मुक्त झालेला ह हा पहिला प्रभाग आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांची भूमिका महत्वाची आहे. डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला बसणार नाही याची पुरेपूर काळजी ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी नेहमीच घेतात. फेरीवाला हटाव पथकाचे वाहन दररोज सकाळ, संध्याकाळ घनश्याम गुप्ते रस्त्यावर कुळकर्णी ब्रदर्स दुकानाच्या बाजुला उभे असते. त्यांना महात्मा फुले रस्त्यावरील प्रवाशांची वाट अडवून बसलेला फळ विक्रेता फेरीवाला दिसत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
तसेच, ह प्रभाग हद्दीत महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, सुभाष रस्ता, महात्मा गांधी, नवापाडा, गरीबाचापाडा रस्ता या वर्दळीच्या रस्त्यांवर दररोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिक हातगाड्या लागत असल्याने या रस्त्यांवर कोंडी होत आहे. पालिकेच्या ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकाने केवळ रेल्वे स्थानकापुरती आपली कारवाई मर्यादित न ठेवता ह प्रभागाच्या अंतर्गत वर्दळीच्या रस्त्यांवरील हातगाड्या, फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. ह प्रभागात काही वर्षापासून ठाण मांडून असलेला एका फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी अन्य विभागात बदली होऊन गेला. या बदली कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने हे फेरीवाले रस्त्यावर व्यवसाय करत असल्याची चर्चा पालिकेत आहे.
ह प्रभाग रेल्वे स्थानक परिसर आणि अंतर्गत रस्त्यांवरील फेरीवाले, हातगाडी व्यावसायिकांवर नियमित कारवाई केली जाते. फुले रस्त्यावर रस्ता अडवून फेरीवाला व्यवसाय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अंतर्गत रस्त्यावर फेरीवाले बसत असतील तर त्यांच्याविरुध्दही कारवाई केली जाईल. -राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग.