कल्याण – जळगाव न्यायालयात मुलाचा हत्येचा बदला घेण्यासाठी गेलेल्या दोन मारेकऱ्यांपैकी एका फरार मारेकऱ्याला कल्याण रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सुरेश रवी इंदाते असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याण रेल्वे स्थानकात मंगल एक्सप्रेसमधून उतरताना अटक करण्यात आली आहे, असे रेल्वे सुरक्षा बळाचे वरिष्ठ निरीक्षक भूपेंद्र सिंह यांनी सांगितले.
मिळालेली माहिती अशी, आरोपी सुरेश इंदाते, त्याचा साथीदार मनोहर दामू सुरळकर हे मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमवारी दुपारी जळगाव येथील न्यायालयात गेले होते. दोन वर्षांपूर्वी मनोहर सुरळकर यांचा मुलगा धम्मप्रिय (१९) याची जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ भांजा जाकीर, रेहनानुद्दीन नईमोद्दीन यांनी हत्या केली होती. वडील मनोहर हल्ल्यात जखमी झाले होते. नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना जळगाव न्यायालयात सोमवारी हजर करण्यात येणार होते. आपल्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला आपण जळगाव येथील न्यायालयात ठार मारू या विचाराने आरोपी सुरेश, वडील मनोहर हे जळगाव न्यायालयात पोहोचले होते.
हेही वाचा – पाळधीनजीक मंदिरात महागणपतीला नाण्यांचा अभिषेक
हेही वाचा – महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात महाविकास आघाडीतर्फे पाचोर्यात आंदोलन
या सगळ्या हालचालींची माहिती जळगाव पोलिसांना अगोदरच लागली असल्याने त्यांनी जळगाव न्यायालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तपासणीच्यावेळी बुरखाधारी इसम ही महिला नसून तो पुरुष असून मनोहर सुरळकर असल्याची खात्री पोलिसांना पटली. मनोहर पोलिसांच्या जाळ्यात अडकताच त्याचा साथादीर सुरेश इंदाते बुरखा घालून न्यायालयात हजर होता. त्याला ही माहिती मिळताच त्याने न्यायालयातून पलायन केले. पोलीस सुरेशच्या मागावर होते. सुरेश जळगाव येथून मंगला एक्स्प्रेसने कल्याणला निघाला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बळाच्या कल्याण पथकाला मिळाली. पोलिसांनी मंगळवारी पहाटे मंगला एक्सप्रेस येण्याच्या वेळेत कल्याण स्थानकात सापळा लावला. पोलीस उपनिरीक्षक पी.पी. शेगांवकर, हवालदार आर.बी. माजरे, कविता सोळंकी यांनी सुरेश एक्स्प्रेसमधून उतरत असताना त्याला अटक केली. सुरेशने हिसका देऊन पळण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्याला जागीच रोखले. त्याच्याकडून गावठी कट्टा, काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.