ठाणे : करोना काळात रुग्णांच्या वाहतूकीसाठी रुग्णवाहीका कमी पडू लागल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने २५ टिएमटी बसगाड्यांचे रुग्णवाहीकेत रुपांतरण करून त्यातून रुग्णांची वाहतूक केली होती. या वाहतूकीपोटी टिएमटी प्रशासनाला राज्य शासनाने चार वर्षानंतर ३८ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजुर केला असून त्यापैकी १ कोटी २० लाखांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल चार वर्षानंतर निधी मिळाला असला तरी तो पुर्णपणे अद्याप मिळू शकलेला नसल्याचे चित्र आहे.

करोना महामारीच्या काळात संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात किंवा विलगीकरण केंद्रात नेण्यासाठी सरकारी तसेच खासगी रुग्णावाहीकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मार्च आणि एप्रिल २०२० या महिन्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली होती. यामुळे रुग्णवाहीका अपुऱ्या पडू लागल्या होत्या. ७० ते ८० रुग्णवाहीकांची आवश्यकता निर्माण झाली होती. यामुळे रुग्णालय किंवा विलगीकरण कक्षात उपचारासाठी जाण्याकरिता रुग्णांना रुग्णवाहीकेची प्रतिक्षा करावी लागत होती. रुग्णांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने परिवहन उपक्रमातील बसगाड्यांचे रुग्णवाहीकेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या नुसार २५ बसगाड्यांचे रुग्वाहीकेत रुपांतर करून त्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात परिवहन उपक्रमामध्ये मे. सिटी लाईफ लाईन प्राव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत जीसीसी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या बसगाड्यांचा समावेश होता. या बसगाड्यांचे रुग्णवाहीकेत रुपांतर करून रुग्णसेवा दिल्याबद्दल सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील देयके देण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार करून राज्य शासनाकडे पाठविला होता. यानुसार देयकापोटी ३८ कोटी ८६ लाख इतकी रक्कमेचे अनुदान देण्याचा हा प्रस्ताव होता. त्यास राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२४ रोजी मान्यता दिली असली तरी तो निधी मात्र मिळाला नव्हता. दरम्यान, काही दिवसांपुर्वी राज्य शासनाने ३८ कोटी ८६ लाखांपैकी १ कोटी २० लाख ९१ हजार इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे तब्बल चार वर्षानंतर निधी मिळाला असला तरी तो पुर्णपणे अद्याप मिळू शकलेला नसल्याचे चित्र आहे.