ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगतच्या साकेत पूलाजवळील रुस्तमजी गृहसंकुलातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या उन्नत सेवा मार्गिकेच्या निर्माणासाठी नगरविकास विभागाकडे या मार्गिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पत्र पाठविले आहे. उन्नत मार्गिका तयार झाल्यास येथील २५ ते ३० हजार रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांच्या वेळेची आणि इंधनाची मोठ्याप्रमाणात बचत होणार आहे.

साकेत पूलालगत रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलामध्ये अनेकांनी कोट्यवधी रुपये मोजून सदनिका खरेदी केल्या. या गृहसंकुलामध्ये सुमारे २५ ते ३० मजल्यांच्या अनेक इमारती आहेत. हे गृहसंकुल घोडबंदरच्या तुलनेत ठाणे स्थानक, मुंबई नाशिक महामार्गापासून जवळचा भाग असल्याने २०१४ नंतर अनेकजण येथे वास्तव्य करण्यास आले. सध्या या भागात साकेत काँम्प्लेक्स आणि रुस्तमजी अर्बेनिया या दोन्ही गृहसंकुलाच्या सुमारे ५ हजार सदनिका असून सुमारे २० ते २५ हजार नागरिक या भागात वास्तव्य करतात. या भागातून एक सेवा रस्ता माजिवडा आणि राबोडीला जोडणारा तयार करण्यात येणार असल्याचे सदनिका खरेदी करताना अनेकांना बांधकाम व्यवसायिकांच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. येथे मोठ्याप्रमाणात रहिवाशी वास्तव्यास येऊ लागल्याने ठाणे महापालिकेने ठराव केला होता. या ठरावानुसार, साकेत ते ऋतु इस्टेट सेवा रस्ता तयार करण्याचे ठरले होते. हा विकास आराखड्यानुसार रस्ता तयार केला जाणार होता. सेवा रस्ता तयार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आता लवकरच हा रस्ता तयार होईल अशी आशा येथील रहिवासी व्यक्त करत होते. परंतु मान्यता मिळून सुमारे आठ वर्ष उलटत असतानाही रस्त्याबाबात महापालिकेकडून निर्णय घेतला जात नव्हता.

हेही वाचा >>>दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली होती. अखेर नागरिकांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. ठाणे महापालिकेने उन्नत सेवा मार्गिकेसाठी ठाणे महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पत्र पाठविले आहे.

रुस्तमजी गृहसंकुल ते ऋतुपार्क या भागात ५५० मीटर लांबीच्या मधल्या भागाचे काम करणायचे आहे. तसेच शहराला पाणी पुरवठा करणारी २७०० मीमी व्यासाची जलवाहिनी जात असल्याने या ठिकाणी नियोजित उन्नत सेवा रस्ता कमी उंचीचा करावा लागणार आहे. त्यासाठी ४८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले. तसेच हा निधी उपलब्ध करण्याची विनंती केली आहे. नगरविकास विभागाकडून त्यास परवानी मिळाली तर येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षांच्या पाठ पुराव्यायाला यश येत आहे. सरकारने लवकरात लवकर हा मार्ग बांधून नागरिकांना दिलासा द्यावा असे येथील रहिवासी डाॅ. सुहास राणे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार, शिवसेनेचे रवी पाटील यांच्या बंडखोरीची शक्यता; पहि

 गृहसंकुलातील बहुतांश रहिवासी नोकरदार आहेत. त्यामुळे ठाणे स्थानक परिसरातून घरी येताना रहिवाशांना मुंबई नाशिक महामार्गाने वळसा घालून साकेत पूल येथून प्रवास करावा लागतो. साकेत पूलावर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडी असते. त्यामुळे प्रवासा दरम्यान अतिरिक्त इंधन जळते. तर मीटर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागतो. सेवा रस्ता तयार झाल्यास रहिवाशांना वृंदावन किंवा माजिवडा येथून थेट प्रवास करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांचा भारही हलका होणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून आम्हाला वळसा घालून गृहसंकुलात यावे लागत आहे. या मार्गासाठी आम्ही अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास येथील नोकरदारांसह वृद्धांचीही गैरसोय टळेल. – मुन्ना शेख, रहिवासी.