डोंबिवली – दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव पहिले त्यांच्या राहत्या घरी काही वेळ नेले जातील. तेथे त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक यांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर तेथून पार्थिव डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येतील.
नागरिकांचे अत्यंदर्शन पूर्ण झाल्यानंतर साडे सात आणि आठच्या दरम्यान तिन्ही पार्थिवांच्या अंत्ययात्रेला सुरूवात करण्यात येणार आहे. भागशाळा मैदानात नागरिकांना तिन्ही पार्थिवांचे एकत्रितपणे रांगेतून दर्शन घेता यावे म्हणून भाजप, शिवसेनेकडून भागशाळा मैदानात पार्थिव ठेवण्यासाठी सजविलेला मंच, मान्यवरांना आदरांजली वाहण्यासाठी व्यासपीठ, सजविलेले वाहन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून भाजपचे डोंबिवली पश्चिम मंडळ माजी अध्यक्ष समीर चिटणीस, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख विवेक खामकर, भाजप आमदार व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून अंत्ययात्रेची तयारी करत आहेत.
संजय लेले, अतुल मोने, हेमंत मोने यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी झुंबड उडू नये म्हणून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेवरून याठिकाणी कडक बंदोबस्त लावला आहे. वाहतूक विभागाने भागशाळा मैदान परिसरात नागरिकांच्या वाहनांमुळे कोंडी होऊ नये म्हणून भागशाळा मैदान परिसरापासून २०० मीटर परिसरातील रस्ते, चौकात कोठेही वाहने उभी करण्यास प्रतिबंध केला आहे.
वाहन चालकांनी आपली वाहने गणेशनगर येथील रेल्वे मैदानात उभी करून मगच पार्थिवांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भागशाळा मैदानात यावे. अंत्ययात्रा मार्गात कोठेही वाहनाचा अडथळा येणार नाही याची काळजी प्रत्येक वाहन चालकाने घेण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी केले आहे. सुमारे साडे सात ते आठच्या दरम्यान अंत्ययात्रेला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंत्ययात्रेचा मार्ग भागशाळा मैदान येथून महात्मा गांधी रस्ता, रेल्वे स्थानक मार्ग, कोपर पूल, टंडन रस्ता, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता ते शिवमंदिर स्मशानभूमी असा आहे. आपल्या मित्र, आप्ताच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी भागशाळा मैदानात गर्दी केली आहे. सुट्टीचा हंगाम असल्याने नेहमीच विद्यार्थी, खेळाडु यांनी विविध खेळांसाठी गजबजून गेलेले भागशाळा मैदान बुधवारी सकाळपासून अंत्ययात्रेच्या तयारीमुळे सुनेसुने आहे. ज्येष्ठ नागरिक शांतपणे आपल्या जागेत बसल्या जागी पार्थिवांचे दर्शन घेता येईल अशा पध्दतीने मैदानातील बाकड्यांवर येऊन बसले आहेत.