कल्याण: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्वाचा भाग असलेल्या ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. नागरीकरणामुळे शहर-खेडी एक होत आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या वस्तीला नागरी सुविधाही तितक्याच जलदगतीने मिळाल्या पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या येत्या २० वर्षाच्या काळातील बृहद आराखडा (मास्टर प्लान) तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कल्याण लोकसभेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे शुक्रवारी दिली.
कल्याण मधील सुभेदारवाडा कट्टा आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे दिवंगत प्रा. रामभाऊ कापसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे सुभेदारवाडा शाळेत आयोजन केले आहे. यावेळी ‘विकासाच्या वाटेवरील कल्याण डोंबिवली शहरे’ या विषयावर खा. शिंदे यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. विश्वनाथ भोईर, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर, कल्याण जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक, डॉ. आनंद कापसे उपस्थित होते.
हेही वाचा >>> ‘मराठी शाळांमध्ये संस्कृतीची जपणूक’; अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे प्रतिपादन
कल्याण डोंबिवली दाट लोकवस्तीची शहरे. या शहरांमध्ये नागरी विकासाची कामे करताना अनेक अडथळे येतात. अशा परिस्थितीत या शहरांसाठी मागील आठ वर्षात केंद्र, शासनाच्या विविध योजनांमधून पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. रस्ते, पूल, वळण रस्त्यांची कामे या शहरांमध्ये सुरू आहेत. या शहरांमधील जीवनमान अधिक सुखकारक होईल यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ही सर्व विकास कामे पू्र्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या शहरांचा तोंडवळा बदलला असेल. कोंडी नावाचा प्रकार याठिकाणी शिल्लक राहणार नाही, असे खा. शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये बेकायदा इमारतीमधील घर विक्री करणाऱ्या विकासकावर गुन्हा
एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे जिल्हा हा महत्वाचा भाग आहे. समृध्दी, बडोदा, विरार-अलिबाग असे महत्वाचे मार्ग या भागातून येत्या काळात जात आहेत. हा विचार करुन जिल्ह्याच्या विविध भागात तशाच रस्ते, पूल, भुयारी मार्ग सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. वाढते दळणवळण बघून त्याप्रमाणे वाहनतळ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले पाहिजेत. हा दूरगामी विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या भविष्यवेधी विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, असे खा. शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील विकासाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस काम करत आहेत. रखडलेली कामे मार्गी लावली जात आहेत. समृध्दी महामार्गाचा महत्वाचा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला. येत्या काळातील ठाणे जिल्ह्याची पाणी गरज ओळखून काळू, शाई धरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहरांसाठी एकत्रित घनकचरा प्रकल्प उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. असेच प्रकल्प कडोंमपा हद्दीत राबविले जातील, असा विश्वास खा. शिंदे यांनी व्यक्त केला. मागील चार वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली शहर परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती खासदारांनी दिली.