जुन्या व नव्या रंगकर्मीच्या स्मृतिचित्रांच्या आठवणी जागवत सुरमई, खिम्यावर ताव मारण्याची अनोखी संधी
मॉल, रेस्टॉरंट, सिनेमागृहांकडे वळणाऱ्या तरुणाईला आणि नाटय़प्रेमींना नाटय़गृहाचे आवारही आपलेसे वाटावे आणि ते तितकेच रंजक भासावे यासाठी ठाण्यातील राम गणेश गडकरी नाटय़गृहाच्या उपाहारगृहात गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला ‘गडकरी कट्टा’ सध्या रंगकर्मीपासून रसिकांपर्यत सर्वासाठी आकर्षणाचे ठिकाण ठरू लागले आहे. मंद प्रकाशात तळ्याकाठी मधुर संगीत ऐकत सुरमई, खिमा-पाव आणि तंदूर पदार्थावर ताव मारत जुन्या-नव्या रंगकर्मीच्या छायाचित्रांसोबत जुन्या काळात रममाण होण्याची अनोखी संधी या कट्टय़ाच्या माध्यमातून रसिकांना उपलब्ध झाली असून या हव्याहव्याशा वाटणाऱ्या बदलांमुळे गडकरीचा हा कट्टा ठाणेकरांच्या सोबतीने सध्या गजबजू लागला आहे.
ठाणे शहरातील सांस्कृतिक वैभवात गडकरी नाटय़गृहाला मानाचे स्थान आहे. दर्जेदार अशा नाटय़कृतींच्या सोबतीला येथील उपाहारगृह, तिथे मिळणारी कांदा भजी, बटाटावडा आणि खिमा-पाव यांसारखे पदार्थही वर्षांनुवर्षे तितक्याच चवीचे आणि चर्चेचा केंद्रिबदू ठरले आहेत. तरीही काळाच्या ओघात अव्यवस्थेमुळे नाटय़गृहाचा हा उपाहार कट्टा काहीसा ओस पडू लागला होता. हे लक्षात घेऊन येथील ‘कॅण्टीन’चा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय उपाहारगृहाचे नवे संचालक संजय पाटील यांनी घेतला. दोन महिन्यांपूर्वी प्लास्टिकच्या टेबल-खुच्र्या एवढाच काय तो उपाहारगृहाचा अवतार नजरेस पडायचा. आता मात्र या आवाराचे रूपडेच पालटले असून रंगायतनच्या तळाला असलेले उपाहारगृह रसिकांसाठी सुखद धक्का ठरू लागले आहे. येथे प्रवेश करताच थोडे तिखट, थोडे गोड म्हणणारी ‘गडकरी कट्टय़ा’ची पाटी, त्यानंतर दारावर घरगुती तयार केलेल्या चमचमीत पदार्थानी भरलेले लाकडी कपाट असे आकर्षक रूप येथे पाहायला मिळते. या कपाटाला ‘होम मेड कट्टा’ असे नाव देण्यात आले आहे. उपाहारगृहाच्या दाराच्या एका बाजूला घडय़ाळ तर दुसऱ्या बाजूला एका ग्रामोफोन ठेवण्यात आला आहे. सायंकाळच्या वेळी तलावाकाठच्या कट्टय़ावर मोहम्मद रफी, किशोर दा, लतादीदींच्या सुरेल गाण्यांचा मंद ध्वनी दरवळत असतो.
ग्रामोफोनच्या वरच्या बाजूला भिंतीवर विष्णुदास भावे, बाळासाहेब ठाकरे, बालगंधर्व, व. पु. काळे आदी दिग्गजांची छायाचित्रे आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला या कलाकारांची ओळख व्हावी, या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूच्या भिंतीवर ठाण्यातील कलाकारांची छायाचित्रे मांडून या भिंतीला ठाणेकर कट्टा असे नाव देण्यात आले आहे. चिन्मय मांडलेकर, रवी जाधव, सोनिया परचुरे आदी कलाकारांच्या छायाचित्रांचा यामध्ये समावेश असून दर दोन महिन्यांनी संपूर्ण कट्टय़ावरील छायाचित्रे बदलण्यात येणार आहेत.

खवय्यांसाठी पर्वणी..
दर आठवडय़ाच्या शुक्रवार, शनिवार, आणि रविवार या दिवशी खाद्य महोत्सवांचेही आयोजन होणार आहे. येथील खिमा-पाव तर प्रसिद्ध आहे. त्यासोबत मत्स्याहार आणि तंदूर पदार्थाचीही रेलचेल असणार आहे.