डोंबिवली- डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौक, पाटकर रस्ता भागात वर्दळीच्या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून सकाळच्या वेळेत जुगार-मटक्याचा अड्डा सुरू आहे. झटपट पैसे मिळविण्याच्या आशेत असलेले रिक्षा चालक, पादचारी, तरुण, कामगार या जाळ्यात ओढले जात आहेत. या अड्ड्यावर मटका खेळणाऱ्यांना उघडपणे लुटण्याचा प्रकार एका टोळीकडून सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार सुरू असताना गस्तीवरील पोलिसांना हा गैरप्रकार दिसत नाही का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. अनेक कुटुंब या जुगार, मटका अड्ड्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत.
हेही वाचा >>> ठाणे महापालिका शाळांचे रूप बदलण्याची चिन्हे; २ सीबीएसई शाळा सुरू होणार
पादचाऱ्यांची लूट
डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौक किंवा पाटकर रस्त्यावर सकाळी आठ वाजता चार ते पाच जण जुगार-मटक्याचा अड्डा लावतात. या टोळक्या मधील दोन ते तीन जण मटक्यावर पैसे लावतात. त्यांना भराभर पैसे लागत जातात. हा प्रकार पाहून बाजुच्या रिक्षा वाहनतळावरील काही रिक्षा चालक, पादचारी, तरुण, काही नोकरदार या माध्यमातून झटपट पैसा मिळतो, म्हणून मटक्यावर पैसे लावतो. त्याला दोन ते तीन डाव मोठ्या रकमेचे लावतात. अधिक पैसे मिळतील या अपेक्षेने पादचारी जवळील पैसे मटक्यावर लावून अधिकचे पैसे मिळतील म्हणून खिसा खाली करतो. मटका टोळीतील भुरटे पादचारी अधिकाधिक जिंकेल अशा चालीने या अड्ड्यावर खेळ करतात. पादचाऱ्याला पैसे कमवून दिले की त्याला टोळीतील सदस्य तेथून हलून देत नाहीत. तू या अडड्यावर खेळत राहा अशी दमदाटी त्याला केली जाते. पादचाऱ्याच्या जवळील गल्ला खाली करुन त्याला कफल्लक केले की मग त्याला तेथून सोडून दिले जाते. अशाच प्रकारे पादचाऱ्यांना जाळ्यात ओढून त्याला उघडपणे लुटण्याचे प्रकार मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात सकाळी आठ वाजल्यापासून मटका जुगार अड्ड्याचा खेळ सुरू आहे.
या उघड लुटमारीने अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहेत. अनेक महिलांच्या या मटका अड्ड्याविषयी तक्रारी आहेत.
या जुगार मटका अ्ड्ड्यावर काय कारवाई करणार याची विचारणा करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना संपर्क केला. त्यांनी नेहमीप्रमाणे संपर्काला प्रतिसाद दिला नाही. शहरातील बेकायदा बांधकामांबरोबर बेकायदा कृत्यांना पोलिसांकडून पाठबळ दिले जात असल्याने शहरातील पोलिसांची काही जागरुक नागरिक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत.