जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या गंधर्व महोत्सवाची सजावट दरवर्षी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी असते. दरवर्षी महोत्सवाच्या थीमप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारात सजावट करण्यात येते. विशेष म्हणजे संपूर्ण महाविद्यालय गंधर्व महोत्सवासाठी सजवण्याचे कौशल्याचे काम विद्यार्थी आवडीने करतात. गेल्या काही दिवसांपासूनच महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी गंधर्वसाठी सजावट करण्याच्या तयारीत दिसत आहेत. या वर्षी ‘नॉस्टाल्जिया’ ही गंधर्व महोत्सवाची थीम असल्याने संपूर्ण महाविद्यालयात नॉस्टाल्जिक गोष्टी महोत्सवाच्या दरम्यान पाहायला मिळणार आहेत. गंधर्वचे यंदाचे दहावे वर्ष असल्याने पहिल्या गंधर्वपासूनचा प्रवास महाविद्यालयात सजावटीच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. गंधर्व महोत्सवाच्या काळात महाविद्यालयात प्रवेश केल्यावर प्रत्येक विद्यार्थी जुन्या आठवणीत रममाण होईल अशी सजावट सध्या विद्यार्थी करत आहेत. लगोरी, गोटय़ा, भोवरे असे लहानपणी खेळणाऱ्या खेळांची सजावटीच्या माध्यमातून आठवण करून दिली जाणार आहे. माजी विद्यार्थ्यांसाठीदेखील नॉस्टाल्जियाची भावना देणारे काही सजावटीचे प्रयोग यंदा गंधर्वमध्ये पाहायला मिळतील, असे गंधर्व महोत्सवाची क्रिएटिव्ह हेड तन्वेशा पांडे हिने सांगितले. (सागर रणशूर)
इंद्रधनु महोत्सवात आंतरशालेय नृत्यस्पर्धा
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात इंद्रधनु महोत्सवात विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. इंद्रधनु महोत्सवाच्या अंतर्गत आंतरशालेय नृत्यस्पर्धेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या स्पर्धेत पंधरा शाळा सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक लोककला, पाश्चात्त्य नृत्यकला, हिंदी चित्रपटांमधील विविध गाण्यांच्या तालावर विद्यार्थी थिरकले. स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानसाधना संस्थेचे कमलेश प्रधान, खजिनदार सतीश शेठ आणि प्राचार्य चंद्रशेखर मराठे यांनी केले. या स्पर्धेत श्री माँ बाल निकेतन हायस्कूल या शाळेच्या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पद्मवती व्यंकटेश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय,कळवा व श्रीरंग विद्यालय, ठाणे या दोन शाळांच्या संघांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली. तसेच श्री माँ विद्यालय, ठाणे या शाळेच्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सर्व शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेत्या संघास अनुक्रमे ५०००, ३०००, २००० रोख रक्कम स्मृतिचिन्ह, सांघिक प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. उत्तेजनार्थ संघास एक हजार रोख रक्कम देण्यात आली. या स्पर्धेसाठी सचिन स्टुडिओजच्या शाखांचे प्रमुख सचिन पाटील, नृत्यदिग्दर्शिका व नाटय़ अभिनेत्री मेधा दिवेकर आणि कथ्थक विशारद तसेच एकापेक्षा एक कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्नेहा चव्हाण आदी मान्यवर परीक्षक होते. महोत्सवासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. विद्या लोणकर, पर्यवेक्षिका डॉ. विद्या हेडाऊ यांचे मार्गदर्शन लाभले होते. स्पर्धेच्या नियोजनात कनिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येक शिक्षकाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. (प्रतिज्ञा पवार-शेटे)
जीवनदीपच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे लक्षवेधी प्रकल्प
विज्ञानाचे पुस्तकी ज्ञान केवळ अभ्यासासाठी मर्यादित न ठेवता विज्ञानाचा विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापर करावा यासाठी महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येते. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कलात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी गोवेली येथील जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागतर्फे ‘विज्ञान प्रदर्शनाचे’ आयोजन केले होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात भेडसावण्याऱ्या समस्या सोडवणारे लक्षवेधी प्रकल्प सादर केले. पंतप्रधानांच्या विचाराने प्रेरित होऊन आदर्श शहर ही संकल्पना प्रदर्शनात मांडली. तसेच शहारांना भेडसावणारी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कचरा विल्हेवाट आणि पेट्रोल व पाण्याच्या मिश्रणात थर्माकॉलचे विघटन करून प्रदूषण कमी करण्याची कल्पना प्रदर्शनात मांडण्यात आली. राज्यातील दुष्काळाची समस्या दूर करण्यासाठी पाणी व्यवस्थापन व रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखे प्रकल्प विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडले होते. विज्ञान हा मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असून विज्ञानाच्या मदतीने आपण समस्यांवर मात करू शकतो हा संदेश या प्रदर्शनातून दिसून येत होता. कमी माती आणि सेंद्रिय खतांच्या मदतीने घरगुती शेतीचा (इंडोअर फार्मिग) वापर करून जास्तीतजास्त पीक घेणे हा प्रकल्प प्रदर्शनातील आकर्षण ठरत होता. तसेच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले एअर कूलर, व्हॅक्यूम क्लीनर आणि शोभेच्या वस्तू असे प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी. कोरे यांनी प्रदर्शनाचे परीक्षण केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी निकिता टेंभे, नरेश धुमाळ, सागर भेरले आणि गौरी भगत यांच्या प्रकल्पास पारितोषिक मिळाले. (प्रशांत घोडविंदे)
आदर्श महाविद्यालयात युवा संमेलन
डोंबिवली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बदलापुरातील आदर्श महाविद्यालयात युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत २५ डिसेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
डोंबिवली येथे यंदाचे ९० अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनासाठी साहित्यप्रेमींमध्ये जागृती व्हावी तसेच रसिक श्रोत्यांचा या संमेलनात सहभाग वाढावा यासाठी संमेलनापूर्वीचे संमेलन आयोजित केले जाते.
बदलापुरात २५ आणि २६ डिसेंबर रोजी हे संमेलनापूर्वीचे संमेलन पार पडणार आहे. तसेच याचसोबत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व आणि हस्तलिखित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निबंध स्पर्धेसाठी स्त्री आत्मचरित्र- काल, आज आणि उद्या, मराठी प्रवासवर्णनात्मक साहित्याचा प्रवास आणि मराठी अनुवाद साहित्यातील माणिकमोती या विषयांवर १९ डिसेंबरपूर्वी प्रत्येक महाविद्यालयातून फक्त दोनच निबंध पाठवायचे आहेत. २४ डिसेंबर रोजी महाविद्यालयात पार पडणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत सेल्फी- असा मी, कसा मी?, तंत्रज्ञानाचा विकास तरीही विज्ञानकथांचा ऱ्हास आणि जागतिकीकरणाने भारतीय भाषा घडतायत की बिघडतायत? या विषयांवर आपले मत मांडायचे आहे.
या दोन्ही स्पर्धासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आदर्श महाविद्यालयात आयोजित करण्यात आले असून या वेळी तज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत.त्याचप्रमाणे २०१५-१६ या काळात महाविद्यालयाच्या मराठी भाषा व वाङ्मय मंडळाने स्वत: केलेल्या हस्तलिखित स्पर्धेसाठी १९ डिसेंबपर्यंत पाठवायचे आहे, अशी माहिती आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि बाल व युवा संमेलन संयोजक वैदेही दफ्तरदार यांनी दिली आहे. तसेच अधिकाधिक महाविद्यालयांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले आहे.
नवरंग महोत्सवात विद्यार्थ्यांची लगबग
जोशी-बेडेकर महविद्यालयात सध्या नवरंग महोत्सवाची रेलचेल पाहायला मिळत असून विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. २४ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. रेड अँड ब्लॅक डे, मास्क डे महाविद्यालयात साजरा करण्यात आला.स्पोर्ट्स डे, विंटर डे, साडी, टाय, चॉकलेट डे आणि रोज डे, ग्रुप अ लाइक डे, हेड गेअर ग्लेर्स डे, पारंपरिक आणि सेल्फी डे, फॉर्मल डे अशा विविध महाविद्यालयीन डेजचे आयोजन करण्यात आले आहे.नवरंगमध्ये मेंदी , वृत्तवाचन, वृत्तलेखन, रांगोळी, केशरचना, वक्तृत्व स्पर्धा, लघुपट स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, गायन, नृत्य स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा अनेक स्पर्धा होणार आहेत. (प्रशांत कापडी)