तुरुंगातील कैद्यांसाठी ‘गांधी’ विचारधाराचा उपक्रम
कैद्यांच्या मनात चांगले विचार रुजावेत आणि गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडण्यासाठी त्यांच्यात प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सवरेदय मंडळातर्फे कैद्यांसाठी महात्मा गांधींच्या विचारांची पेरणी करण्याचा आगळावेगळा प्रयत्न करण्यात आला. या वेळी कैद्यांसाठी गांधी विचारधारा ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ९८ कैदी सहभागी झाले होते. त्यापैकी ५० कैदी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
महात्मा गांधींनी ज्याप्रमाणे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला जगण्याचा उत्तम मार्ग दाखवला. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन कैद्यांनी चांगले काम करून आपले भविष्य अंधकारातून प्रकाशाकडे न्यावे. तसेच गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर कायम राहावा या उद्देशाने ५वी ते ७वी, ८वी ते १०वी आणि ११वी ते पदवीधर अशा तीन गटांमध्ये कैद्यांसाठी ‘गांधी विचारधारा’ ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेच्या पंधरा दिवस आधी सहभागी झालेल्या कैद्यांना गांधीजींच्या जीवनावर आधारित पुस्तके अभ्यासाकरिता देण्यात आली होती. या पुस्तकाचा अभ्यास करून २५० पैकी ९८ कैद्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील ५० कैदी प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
या वेळी अप्पर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक भूषण कुमार उपाध्याय यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या ५० कैद्यांना प्रमाणपत्र तर उर्वरित कैद्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कैद्यांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्राचे उद्घाटन पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कैद्यांच्या सुलभतेसाठी आप्टर बॅरेकही सुरू करण्यात आले. यामुळे येथील कैद्यांना स्वत:चे हक्क, सवलती, रजा, उपाहारगृहाची नियमावलीची माहिती मिळेल. येथील महिला कैद्यासाठीच्या ब्युटी पार्लर कोर्सचेही उद्घाटन करण्यात आले. तसेच येथील महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीची पाहणी उपस्थित पाहुण्यांनी केली.

Story img Loader