मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात बेमुदत उपोषण पुकारले आहे. टोल दरवाढ झाल्याने हे उपोषण सुरू केले असून मनसे नेहमी आक्रमक भूमिका घेते असा ठपका आहे. हा ठपका पुसण्याकरता हे उपोषण सुरू करण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
अविनाश जाधव म्हणाले की, “आतापर्यंत अनेक अधिकारी भेटून गेले. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारचे अधिकाही भेटायला आले होते. १ तारखेपासून जी टोल दरवाढ झाली आहे, त्याला तत्काळ स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे. त्याबाबतीत ते ठोस निर्णय द्यायला तयार नाहीत. त्यामुळे उपोषण सुरू ठेवलं आहे. “
हेही वाचा >> “एकनाथ शिंदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की…”, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले, म्हणाले…
मागच्या अनेक वर्षांपासून समाजात एक ठपका आहे की मनसे नेहमी आक्रमक आंदोलन करते. तोडफोड करते. या ठपक्यासाठी माझं हे शांततेचं आंदोलन होतं. पण त्यांनाही कळूदेत की मनसे स्टाइलने आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रिझल्ट मिळतो, पण शांततेत आंदोलन करताना आठ आठ दिवस बसावं लागतं. त्यामुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेलाच मार्ग योग्य होता. आमच्या हातची भाषा कळत नाही तोवर निर्णय होत नाही. आमचा गांधी सप्ताह आज संपणार आणि उद्यापासासून भगतसिंहांचा मार्ग अवलंबणार, असा इशाराही अविनाश जाधव यांनी दिला आहे.
“टोलनाक्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात धर्मवीर आनंद दिघेंनी १९९९ साली सुरू केली होती. त्यावेळेला हा टोल सुरूही झाला नव्हता. २०१६ मध्ये एकनाथ शिंदे यांनी याचिकाही दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने असं म्हटलं होतं की स्वतः मंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर ते मंत्री झाले तेव्हा त्यांनी याचिका मागे घेतली.आता टोलबंदीवर सोडा, टोल दरवाढीवरही ते काही बोलत नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.
राज ठाकरेंनी घेतली भेट
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उपोषण मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव आता उपोषणा मागे घेणार आहेत. उपोषण मागे घेतल्यानंतर मनसे या प्रश्नी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.