ठाणे महापालिकेचे नियम पायदळी तुडवून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सॅटीसखाली बांधण्यात आलेल्या मंडपाचा मुजोरपणा अद्याप सुरूच असून ‘लोकसत्ता’ने या विषयीची बातमी प्रसिद्ध करताच बाजूचा अतिरिक्त भाग काढून केवळ कारवाईचा देखावा करण्यात आला आहे. या मंडपासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्रे, दिशादर्शकाचे फलक अद्याप मंडपाच्या दर्शनी भागात लावले नसतानाही पालिका प्रशासनाने विशेष मेहरनजर असल्याचा आरोप प्रवाशांकडून होऊ लागला आहे. ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर गुरुवारी सकाळी या भागामध्ये पालिकेचे पथक आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या भागातील मंडपाचा अतिरिक्त भाग काढण्यास सांगितला. त्यानंतर तेथील पत्रे हटवून जागा मोकळी करण्यात आली परंतु मंडपाचा अद्यापही मोठा भागा ‘जैसे थे’ आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर सॅटीसखाली गणेशोत्सव साजरा केला जात असून त्यासाठी सॅटीसच्या जिने उतरण्याच्या ठिकाणीच हा मंडप बांधण्यात येतो. गेली अनेक वर्षे हा मंडप लहान आकाराचा असताना यंदाच्या वर्षी न्यायालयाचे निर्देश आणि महापालिकेचे कडक र्निबध असतानाही या मंडपाचा आकार अवाढव्य करण्यात आला आहे. या मंडपाची उंची सॅटीसच्या उंचीच्या बरोबरीची आहे. त्यामुळे या मंडपाच्या स्थिरता प्रमाणपत्राचाही प्रश्न अनुत्तरित असून मंडपाला मिळालेले प्रमाणपत्र दर्शनी भागामध्ये लावण्याची गरज असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याने या प्रकरणी ‘लोकसत्ता ठाणे’तून आवाज उठवण्यात आला होता.

या प्रकरणाची दखल घेऊन पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा प्रयत्न केला असला तरी मंडपाच्या बाजूचे काही पत्रे हटवून केवळ कारवाईचा देखावा करण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकात सात लाख प्रवासी रोज ये-जा करीत असून गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत असते. त्यामुळे या भागातील बराच भाग मोकळा ठेवून नागरिकांना किमान उभे राहण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु या भागात अवाढव्य मंडप उभारण्याबरोबरच, फेरीवाले आणि अनधिकृत पागचा त्रास नागरिकांना होत आहे.

नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना

Story img Loader