महापालिका, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलामध्ये समन्वयाचा अभाव
गणेशोत्सवाला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असताना मीरा-भाईंदर शहरातील निम्म्याहून अधिक गणेश मंडळांना महापालिकेकडून मंडप परवानगीच प्राप्त झाली नसल्याने मंडळे हवालदील झाली आहेत. परवानगीवरून मीरा-भाईंदर महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्यात टोलवाटोलवी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. वाहतूक पोलिसांकडून ना हरकत दाखला मिळत नसल्याने परवानगी प्रलंबित राहिल्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे, तर प्राप्त झालेल्या बहुतांश अर्ज हातावेगळे करण्यात आले असल्याचा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. याव्यतिरिक्त गणेश मंडळांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आकडेवारीवरूनही प्रभाग कार्यालये, अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यात गोंधळाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागांमधील समन्वयाच्या अभावापायी गणेश मंडळे मात्र त्रस्त झाली आहेत.
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत असलेल्या गणेश मंडपांसाठी महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक असते. महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात अर्ज केल्यानंतर या विभागाकडून वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल या विभागांना हे अर्ज पाठवले जातात. या दोन्ही विभागाचे ना हरकत दाखले मिळाले की प्रभाग अधिकाऱ्यांकडून गणेश मंडळांना मंडप परवानगी दिली जाते. मंडप परवानगीसाठी एक महिना अगोदरच अर्ज करणे गणेश मंडळांना बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्या सहा प्रभाग कार्यालयात गणेश मंडळांकडून मंडप परवानगीसाठी एकंदर २०२ अर्ज प्राप्त झाले. यापैकी सोमवापर्यंत केवळ ६८ अर्जच मंजूर करण्यात आले आहेत. यातही प्रभाग कार्यालय क्रमांक एकमध्ये तब्बल ३० अर्ज आलेले असताना एकही अर्ज अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. उर्वरित १३४ अर्जापैकी ११५ अर्ज वाहतूक विभागाकडेच प्रलंबित आहेत आणि वाहतूक विभागाकडून ना हरकत दाखले देण्यात आले नसल्याने मंडळांना परवानगी देण्यात आली नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिसांच्या वाहतूक विभागाने मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. वाहतूक विभागाकडे एकंदर २०० अर्ज प्राप्त झाले असून त्यातील १९३ अर्ज मंजूर करून महापालिकेकडे पाठवण्यात आले आहेत. उर्वरित ७ अर्जही सोमवारीच निकाली काढण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आणखी वेगळीच आकडेवारी आहे. या विभागाकडे एकंदर १७५ अर्ज प्राप्त झाले असून यातील १४३ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत आणि ३० अर्ज सोमवारी सायंकाळपर्यंत मंजूर करण्यात येतील, असे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे.
अर्ज मंजुरीचे गाडे अडले कुठे?
महापालिकेचे प्रभाग अधिकारी, अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी दिलेल्या अर्जाच्या आकडेवारीत मोठीच तफावत दिसून येत आहे. यामुळे या तीनही विभागात समन्वय नसल्याचे यावरून उघड होत आहे. या सावळ्यागोंधळामुळे अर्ज मंजुरीचे गाडे नेमके कुठे अडले आहे, अशा संभ्रमात गणेश मंडळे सापडली आहेत. गणेशाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही मंडप परवानगी हाती पडली नसल्याने पदाधिकारी अडचणीत सापडले आहेत.
दाद कुणाकडे मागायची?
मंडपाला परवानगी दिल्याशिवाय मंडप उभारल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा माहापालिकेने दिलेला असताना महापालिकेकडूनच मंडप परवानगी देण्यास उशीर होत असल्याने दाद मागायची कोणाकडे, असे असे एका गणेश मंडळ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. गणेशोत्सवासाठी साजवट करण्यास अनेक दिवस लागत असतात त्यातच दिलेल्या मुदतीत अर्ज करूनही महापालिकेकडून मंडप परवानगी मिळत नसल्याने काही मंडळांनी कारवाईची भीती न बाळगता परवानगी मिळण्याअगोदरच मंडप उभारलेही आहेत.