ठाणे : भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणेच माघ महिन्यातील गणेश जयंती देखील गेल्या काही वर्षांपासून धूमधडाक्यात साजरी केली जात आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात २ हजार ४१९ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना १ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये १५८ सार्वजनिक तर २ हजार २६१ खाजगी गणेशमुर्ती आहेत.

माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी गणेश भक्तांची सजावटीसाठी लगबग सुरू झाली आहे. अनेक प्रकारचे गार्हाणे घालत माघी गणेशाचा नवस अनेक जण करतात. नवस पुर्ण करण्यासाठी माघी गणेशाची प्रतिष्ठापना करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून माघी गणपतीला नवसाचे स्वरुपही प्राप्त झाले आहे. यामध्ये दीड, पाच, सात, दहा, अकरा दिवसाच्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमुर्तींचे आगमन होत आहे. पहिल्या दिवशी गणेशमुर्तींचे पूजन केले जाते त्याचप्रमाणे अनेकजण त्याच दिवशी सत्यनारायण पुजाही करतात. या पुजेसाठी पुरोहितांकडे नोंदणी करण्यास सुरूवात झाली आहे. शनिवार १ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाली माघ शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश जयंती आहे. त्यामुळे गणेश मुर्तींच्या स्थापनेचा मुहूर्त हा सकाळी ११ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असणार आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

मुर्तीकारांची लगबग

ठाणे शहरात सांस्कृतिक आणि पारंपारिक उत्सव हे उत्साहात साजरे केले जातात. नवरात्र तसेच गणेशोत्सव यांसारखे अनेक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे होतात. तसाच उत्साह हा माघी गणेशोत्सवासाठी ठाणेकरांमध्ये कायम आहे. माघी गणेशोत्सवासाठी मूर्तिकाराकडे गणेश मूर्तीच्या नोंदणीसाठी सुरूवात झाली आहे. १ ते ५ फुटांपर्यंत मुर्तीं तयार करण्यात आलेल्या आहेत. या मुर्ती १५०० ते २५०० रूपयांपर्यंत आहेत असे मुर्तीकार सुनील गिरकर यांनी सांगितले.

आयुक्तालयात स्थापन होणाऱ्या मुर्ती

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे, वागळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या पाचही परिमंडळांमध्ये मोठया उत्साहात माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक घरगुती गणपतींची स्थापना भिवंडी परिमंडळात होणार आहे. ठाणे – घरगुती ३५६ तर सार्व २२, भिवंडी – घरगुती ७७६ तर सार्व ६, कल्याण- घरगुती ७०५ तर सार्व ६६, उल्हासनगर घरगुती २५९ तर ३३ आणि वागळे- घरगुती १६५ तर सार्व ३१ अशी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

Story img Loader