भगवान मंडलिक, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांची नवी मुंबईत भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा भोईर समर्थकांमध्ये सुरू आहे.

या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाण्यातील ठाकरे गटातील एका बड्या नेत्याचीही भोईर यांनी भेट घेतली असल्याचे समजते. या उच्च पदस्थांच्या भेटीगाठीने भोईर यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील आपला खुंटा बळकट करण्याचे काम सुरू केले असल्याचे बोलले जाते. कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात येत नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना आव्हान देईल असा तगडा उमेदवार अद्याप ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.

आणखी वाचा-प्रस्तावित पोशीर धरणाच्या बुडित क्षेत्र, माती सर्वेक्षणाला लवकरच प्रारंभ

अनेक इच्छुक उमेदवारांनी शिंदे यांच्या समोर आपला टिकाव लागले का, अशी आर्थिक गणिते करून इच्छुक उमेदवारीतून माघार घेतली आहे. शिंदे यांना आक्रमक शह देतील असे मनसेचे आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर हे दोनच उमेदवार या भागात आहेत. परंतु, मनसेने महायुती बरोबर जुळते घेतल्याने मनसेचे पाटील या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. उरलेले भोईर हे समोरील बलदंड शक्तिपुढे कसे लढायचे या विवंचनेत आहेत. मात्र आगरी समाजातील ज्येष्ठ, संस्था, संघटनांनी भोईर यांना उमेदवारीसाठी गळ घातली आहे.

नागरिकांचा मिळणारा वाढता पाठिंबा, आगरी समाजासह मुंब्रा, कळवा मतदारसंघातून मिळणारे पाठबळ विचारात घेऊन मंगळवारी सुभाष भोईर यांनी कल्याण, डोंबिवलीत वजन असलेल्या आणि अनेक वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या गणेश नाईक यांची भेट घेतली असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदारसघात भाजपच्या नाईक कुटुंबियांना उमेदवारी देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे. या उमेदवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोलदांडा टाकून ठाण्याची जागा शिवसेनेचीच असा आग्रह कायम ठेवला आहे.

आणखी वाचा-ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेचा दावेदार आहे. ही जागा शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात फुटीर शिंदे यांना धडा शिकविणार, असे आव्हान यापूर्वी कल्याण दौऱ्याच्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार शिंदे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी नवी मुंबई, ठाण्यातील आगरी समाजातील नेते, ज्येष्ठ मंडळींनी सहकार्य करावे, यासाठी भोईर यांनी ही भेट घेतली असल्याची चर्चा भोईर समर्थकांमध्ये आहे.

कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, अंबरनाथ हे आगरी बहुल मतदारांचे पट्टे आहेत. दिवा, मुंब्रा भोईर यांचे बलस्थान आहे. याशिवाय शिंदे समर्थकांमधील अस्वस्थ सुप्तपणे भोईर यांच्या संपर्कात आहेत. ही मोट बांधून कल्याण लोकसभेसाठी सज्ज होण्याची तयारी भोईर यांनी सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी सुभाष भोईर, ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना सतत संपर्क साधला. त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाहीत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh naik subhash bhoirs meeting is the beginning of new political equation mrj