ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरविला जाणार आहे. ठाण्यातील चौका-चौकात गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचे फलक झळकू लागले आहेत. हिरानंदानी मिडोज येथील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ११ एप्रिलला हा जनता दरबार भरणार आहे. डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात आहे. तर नाईकांच्या पालघर जिल्ह्यात आज, बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ‘शिवसेनेचा लोकदरबार’ भरणार असल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. परंतु याच जिल्ह्यात गेल्याकाही वर्षांत भाजपची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्यासह प्रताप सरनाईक यांना शिंदे यांच्या शिवसेनेतून मंत्रीपद मिळाले आहे. तर भाजपने नवी मुंबईतील भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना वन मंत्री केले आहे. गणेश नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी ठाण्यात ‘फक्त कमळ’ अशी घोषणा केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तसेच दीड महिन्यांपूर्वीच ठाण्यात नाईकांनी जनता दरबार भरविला होता. या जनता दरबारात मोठ्याप्रमाणात नागरिक समस्या घेऊन आले होते. नाईकांच्या जनता दरबाराच्या घोषणेनंतर मात्र शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. समाजमाध्यमांवर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया उमटत होत्या.

गणेश नाईक यांनी आता पुन्हा ठाण्यात जनता दरबार भरविला आहे. त्यासंदर्भाची फलकबाजी संपूर्ण ठाण्यात सुरु झाली आहे. ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा जनता दरबार भरविला जाणार आहे. हे नाट्यगृह ओवळा माजिवडा मतदारसंघात येत असून प्रताप सरनाईक हे या मतदारसंघातून निवडून येत आहेत.

सरनाईकंचा पालघरमध्ये ‘शिवसेना लोकदरबार’

ठाण्यातील डाॅ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात वन मंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरणार आहे. गणेश नाईक यांच्याकडे पालघर जिल्ह्याचे पालकत्त्व आहे. याच पालघर जिल्ह्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आज, बुधवारी ‘शिवसेनेचा लोकदरबार’ भरणार आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील नियोजन समिती सभागृहात सरनाईक यांचा हा लोकदरबार भरणार आहे. त्यासाठी सरनाईक यांनी समाजमाध्यमावर पोस्ट प्रसारित केली आहे. या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. ‘जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचा लोक दरबार’ असा मजकूर यामध्ये लिहीला आहे.