ठाणे : गणेशोत्सवाच्या रोषणाईसाठी रस्त्यावरील खांबामधून वीज जोडणी घेतली जात असल्याने एखादी दुर्घटना होण्याची भिती असते. अशा घटना घडू नयेत यासाठी गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावरील खांबातून रोषणाईसाठी वीजपुरवठा घेऊ नये. मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात घेतलेल्या वीज मीटरमधून विद्युत रोषणाईसाठी वीजपुरवठा घ्यावा, अशा स्पष्ट सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील नोंदणीकृत नसलेल्या गणेश मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्ज प्राप्त होतील त्याचदिवशी शक्यतो त्यांना परवानगी देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा – डोंबिवलीत भोपर येथे बांधकाम सामान वाहू उदवाहक कोसळून कामगार गंभीर जखमी

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, पालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, महावितरण, टोरंट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद बल्लाळ सभागृहात ही बैठक पार पडली. ठाणे शहरातील तलाव प्रदूषित होऊ नयेत म्हणून गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाते. यंदाही पालिका क्षेत्रात अशाप्रकारचे कृत्रिम तलाव तयार केले जाणार असल्याची माहिती आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिली. कृत्रिम तलावांसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचा पुढील वर्षी कसा वापर होईल. जेणेकरून खर्चात बचत होईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. कृत्रिम तलावात लहान मूर्तींचे विसर्जन केले जाते तर, खाडीमध्ये मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. कृत्रिम तलावांमध्ये किती फुटांची मूर्ती विसर्जित होऊ शकते, याची माहिती उपलब्ध नसते. अनेकदा मंडळे गणेश मूर्ती घेऊन आल्यावर त्यांचे पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांशी वाद होतात. असे मुद्दे मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी बैठकीत मांडले. असे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक कृत्रिम तलावांच्या परिसरात किती फुटांची मूर्ती विसर्जित होऊ शकते, याचे फलक लावण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच कृत्रिम तलावात लहान मुले पोहण्यासाठी उतरून अपघात होऊ नयेत यासाठी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

दिड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनापूर्वी सर्व तलावांची कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मार्गावरील उन्नत विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना घडू नये म्हणून वीज वितरण विभागाने त्या ठिकाणी पथक नेमावे. गणेश मंडळांच्या परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलण्याबरोबरच फेरीवाले हटवावेत. लोकमान्यनगर येथील बेवारस भंगार गाड्या हटवाव्यात. विविध कामांसाठी रस्ते बंद ठेवण्यात आले असतील तर, तेथील कामे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत. कृत्रिम तलावांजवळ जीवरक्षक नेमावेत आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय ठेवावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा – कल्याण येथील बंद एनआरसी कंपनीतील रोहित्रामध्ये स्फोट होऊन दोन जण जखमी

अनामत रक्कम वाद

गणेशोत्सवासाठी मंडळे तात्पुरती वीज जोडणी घेतात. त्यासाठी महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरतात. परंतु तीन वर्षे उलटूनसुद्धा ही रक्कम परत मिळत नाही. तसेच वीज मीटर सदोष असल्यामुळे देयक जास्त येते. याबाबत तक्रारी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज करून फेऱ्या माराव्या लागतात. तरीही ती मिळत नाही, अशा तक्रारी मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केल्या. त्यावर अनामत रक्कम परत केली जाते आणि त्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत मंडळांनी नाराजी व्यक्त केली. अखेर मंडळांना देण्यात येणारे वीज मीटर सदोष नसावेत. तसेच त्यांची देयकासंदर्भात तक्रार असेल तर तीचे निरसन करावे आणि अनामत रक्कमेतून ती रक्कम घेऊन उर्वरित रक्कम त्यांना द्यावी. ज्यांची तक्रार नसेल त्यांना अनामत रक्कम तत्काळ द्यावी. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशा सूचना आयुक्त बांगर यांनी केल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh utsav mandals should connect electricity only from official meters thane mnc commissioner instructions to ganesh utsav mandals ssb