ठाणे – उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मुर्तींच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या निर्णया विरोधात ठाणे शहरातील गणेशोत्सव मंडळांनी तसेच मूर्तिकारांनी रविवारी ठाण्यातील किसन नगर परिसरात घंटानाद आंदोलन केले. यावेळी शहरातील १५० ते २०० गणेशोत्सव मंडळाच्या सभासदांचा तसेच पेणचे २५ ते ३० मूर्तीकार उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींवर २०२० मध्ये बंदी घातली होती. परंतू, विविध कारणांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर यंदाच्या माघी गणेशोत्सवापासून १०० टक्के पीओपीबंदीचा निर्णय लागू करण्यात आला. माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची कुठेही विक्री होऊ देऊ नका. ती झाली असल्यास त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करू देऊ नका, असे आदेश उच्च न्यायालयाने ३० जानेवारी रोजी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि महापालिकांना दिले. उच्च न्यायालयाच्या या निर्णया विरोधात ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय संस्थेच्या वतीने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि पेणच्या गणेश मुर्तीकारांनी घंटानाद आंदोलन केले. पीओपी बंद करुन त्याजागी पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती तयार करावी हा निर्णय घेण्यापूर्वी मुर्तीकारांसोबत  चर्चा होणे गरजेचे होते. शाडू मातीच्या मूर्तीचे देखील दुष्परिणाम असतात. ही मूर्ती हाताळण्यास अवघड आणि नाजूक असते.

तिला खूप जपावे लागते हा विचार न्यायालयाने केला होता का असा सवाल यावेळी गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केला. तर, शाडू मातीची मूर्ती घडविण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. त्यामुळे मूर्तीकाराला एका दिवसात केवळ एक ते दोन मूर्ती घडवता येतात. या मातीची मूर्ती घडवताना उंची ची मर्यादा येते. तसेच या मूर्ती पीओपी मूर्तीच्या दराच्या तुलनेत महाग असतात. या मूर्तीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी असेल का असा सवाल मूर्तीकारांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यातील किसनगर भागात असलेल्या वरदविनायक मंदिरात गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी तसेच पेणहून आलेल्या मूर्तीकारांनी गणपतीची महाआरती म्हणत घंटानाद आंदोलन केले.