लोकसत्ता वार्ताहर
शहापूर : पैशांच्या वादातून दोघांची सर्पदंश करुन त्यांची हत्या करणाऱ्या एका टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. गणेश खंडागळे, नारायण भोईर, जयेश फर्डे, अरूण फर्डे आणि सोमनाथ जाधव अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
शहापूर येथील धसई भागात ११ जूनला जमिनीत पुरलेला मृतदेह आढळल्याची माहिती ग्रामस्थांनी शहापूर पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे शहापूर पोलीस ठाण्याचे पथक आणि नायब तहसीलदार घटनास्थळी पोहोचले असता, जमिनीत पुरलेले मृतदेह पथकाने बाहेर काढला. मृतदेहाच्या अंगातील शर्ट व बोटांमधील अंगठ्यांवरून दुसऱ्याच दिवशी मृतदेह टिटवाळा येथील रेल्वेतील निवृत्त तिकीट तपासनीस गोपाळ रंगय्या नायडु यांचा असल्याचे समोर आले आणि तपासाची सूत्रे वेगाने फिरली.
आणखी वाचा-मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्याला अटक; कपाट उघडण्यासाठी थेट किल्ली तयार करणाऱ्यालाही आणले होते घरी
स्थानिक गुन्हे शाखा आणि शहापूर पोलिसांनी समांतर तपास करीत धसई येथील अरुण फर्डे आणि कल्याण येथील सोमनाथ जाधव या दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांची कसून चौकशी केली असता पैशांची देवाण- घेवाण प्रकरणातून मुख्य सूत्रधार रमेश मोरे याने कट रचल्याचे समोर आले. तसेच गोपाळ नायडु यांना ३ जूनला नाग या विषारी सर्पाचा दंश देऊन व चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस पथकाने याप्रकरणात सहभागी सर्पमित्र गणेश, नारायण आणि जयेश या तिघांनाही अटक केली. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक यांनी या आरोपींची आणखी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी पडघा येथे राहणाऱ्या बाळु पाटील यांचीही पैशांच्या व्यवहारातून सर्पदंश देऊन हत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणात मुख्य आरोपी रमेश मोरे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.