भिवंडी येथील काल्हेर भागात १६ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री उशीरा चितळसर पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण नारपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सामूहिक अत्याचाराच्या या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
अटकेत असलेले तिघेही ठाण्यातील वागळे इस्टेट भागात राहणारे आहेत. यातील एका तरूणाची सुमारे दीड वर्षांपूर्वी पिडीत मुलीसोबत इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर ओळख झाली होती. शुक्रवारी दुपारी तरूणाने पिडीत मुलीला भिवंडी येथील काल्हेर भागातील त्याच्या मित्राच्या बंद असलेल्या घरी नेले. त्यानंतर तिथे इतर दोघेजण आले. या तिघांनी पिडीत मुलीला दोरीच्या साहाय्याने बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला मारहाण केली. घटनेबद्दल कुठेही सांगितल्यास मारण्याची धमकीही दिली.

हेही वाचा – टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

पिडीत मुलगी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याआधारे, चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच चितळसर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचच्या पथकाने तिघांना वागळे इस्टेट येथून ताब्यात घेतले. हा प्रकार भिवंडीत घडल्याने हे प्रकरण चितळसर पोलीस ठाणे येथून नारपोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. तिन्ही आरोपींचा ताबा नारपोली पोलिसांकडे देण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

Story img Loader