कल्याण – बीड, परभणीसारख्या गंभीर परिस्थितीची पुनरावृत्ती भिवंडी शहर, ग्रामीण भागात निर्माण होऊ नये. भिवंडी शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी लोकसभेत १४ गंभीर गुन्हे दाखल एका कुख्यात इसमाचा उल्लेख संसदेत करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ हालचाली करून इगतपुरी येथून सुजित पाटील उर्फ तात्या यांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी ही माहिती माध्यमांना दिली. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की सुजित पाटील उर्फ तात्या यांच्यावर एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर एका गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याने (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. चार वर्ष ते तुरुंगात होते. तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या जुन्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला होता.

मागील चार ते पाच वर्षाच्या कालावधीत सुजित पाटील यांचे नाव भिवंडी परिसरात सर्वाधिक चर्चेत होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात बीड, परभणी सारख्या घटना घडू नयेत. या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती शांत राहावी यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची मागणी लोकसभेत केली होती. त्यांच्या भाषणाचा पूर्ण रोख १४ गुन्हे दाखल सुजित पाटील उर्फ तात्या यांच्या दिशेने होता. खासदार म्हात्रे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर वेगाने सूत्र हलली.

ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने सुजित पाटील यांचा माग काढून त्यांना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून अटक केली. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तात्या यांची कसून चौकशी करण्याची मागणी भिवंडी परिसरातील तक्रारदार नागरिकांकडून करण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने सुजित पाटील यांचा ताबा भिवंडी तालुका पोलिसांना अधिकच्या तपासासाठी दिला आहे.

बीड येथे वाल्मिक कराड उर्फ आका, भिवंडीचे सुजित पाटील उर्फ तात्या आता पोलिसांच्या रडावरवर येऊ लागल्याने शासनाने गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.

अटक करण्यात आलेल्या सुजित पाटील गुन्हेगारावर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात ३०७ चा गुन्हा दाखल आहे. तो या गुन्ह्यात पोलिसांना पाहिजे होता. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. इगतपुरी येथून पाटील याला अटक करण्यात आली आहे. दादासो एडके,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, भिवंडी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster sujit patil arrested after mp suresh mhatre raise question in lok sabha zws