दोन वर्षासाठी तडीपार असतानाही पोलिसांना चकवा देत कल्याणमध्ये येऊन लुटमारीचे प्रकार करणाऱ्या दोनपैकी एका तडीपार गुंडाला बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. कोल्हापूरहुन कल्याणमध्ये धान्य घेऊन आलेल्या एका ट्रकचालकाला लूट असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्याची रवानगी पुन्हा जिल्ह्याच्या बाहेर करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री सभागृहात येताच तोंडाला कुलूप!, ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची भाजपची मागणी पण..
उमेर नाविद शेख (२५, रा. चौधरी मोहल्ला, दूधनाका, कल्याण पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याचा दुसरा साथीदार जहीर शेख हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.उमेर आणि जहीर या कुख्यात गुंडांच्या वाढत्या उपद्रवामुळे पोलिसांनी त्यांना दोन वर्षासाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्यामुळे कल्याण परिसरातील चोरी, लुटमार, दहशतीचे प्रकार कमी झाले होते. हे दोन्ही तडीपार गुंड काही दिवसापूर्वी पोलिसांना चकवा देऊन कल्याणमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पुन्हा रात्रीच्या वेळेत दहशत, दादागिरीचा अवलंब करुन पादचारी, वाहन चालकांना लुटीचे प्रकार सुरू केले होते.
शनिवारी रात्री कोल्हापूर येथून एक मालवाहू ट्रक चालक फिरोज शेख (२५, रा. तुळजापूर) हे धान्य घेऊन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत येत होते. लांबचा प्रवास करुन आल्याने त्यांनी ट्रक बाजार समिती आवारात उभा केला. भोजनासाठी ते बाजार समितीतुन बाहेर पडून रस्त्याने जात असताना उमेर, जहीर यांनी त्यांना अडविले. त्यांनी थेट फिरोज यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच्याकडील मोबाईल, जवळील पैसे काढून घेतले. फिरोजने प्रतिकार केला. परंतु दोघांनी त्यास दाद दिली नाही. ही झटापट सुरू असताना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल यांनी हा प्रकार पाहून तिथे धाव घेतली. त्यावेळी जहीर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. तर उमेर पोलिसांच्या तावडीत सापडला.
हेही वाचा >>>ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात विकासकामांत गैरव्यवहार ? भाजपच्या आरोपांमुळे शिंदे गोटात अस्वस्थता
उमेरला पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा तो तडीपार गुंड असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण घोलप यांचे पथक फरार जहीरचा शोध घेत आहेत. जहीरमुळे कल्याणमध्ये पुन्हा लुटमारीच्या घटना वाढण्याची भीती पोलिसांना आहे.
(कल्याणमध्ये तडीपार गुंड अटकेत.)