कल्याण – कल्याण पश्चिमेत पोलिसांचे रात्रंदिवस व्यसनमुक्ती, नशामुक्ती अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत कारवाई करताना पोलीस उपायु्क्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने दुर्गाडी किल्ला परिसर आणि गांधारी पूल भागातून तीन इसमांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० ग्रॅम वजनाची ३१ हजार रूपये किमतीची मेफाड्रोन (एम.डी.) पावडर, दोन हजार १८० ग्रॅम वजनाचा ३२ हजार रूपये किमतीचा गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी तीन महिन्यापूर्वी कल्याण पोलीस परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर कल्याण, डोंबिवली शहर व्यसनमुक्त, नशामुक्त आणि गैरकृत्य, गैरधंद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. या कामासाठी त्यांनी परिमंडळ हद्दीतील रामनगर, विष्णुनगर, खडकपाडा, बाजारपेठ, विष्णुनगर, टिळकनगर, कोळसेवाडी, महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस यंत्रणेला कामाला लावले आहे. मागील चार वर्षात कल्याण, डोंबिवलीत पोलिसांकडून कधीही गैरधंदे, टवाळखोरांविरुध्द कारवाई न झाल्याने शहरात गैरधंद्यांची बजबुरी माजली आहे. स्थानिक भाई, दादा, टवाळखोर यांच्या बेशिस्तीला उधाण आले आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली एमआयडीसीत सीमेंट काँक्रीटचा नवीन रस्ता तोडल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

ही सर्व कृत्ये मोडून काढण्याचे नियोजन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे. या कारवाईसाठी उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली विशेष अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाई पथक तयार करण्यात आले आहे.

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला परिसरातील सीएनजी पंप भागात सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी विशेष पथकाला शनिवारी माहिती मिळाली. पथकाने दुर्गाडी किल्ली सीएनजी पंप भागात सापळा लावला. पोलिसांनी त्या भागातील हालचालींवर लक्ष केंद्रीत केले. तेथे त्यांना नितीन हिम्मतभाई ओझा (५२, रा. भिवंडी), परवीन फिरोज शेख (रा. भिवंडी) हे दोन इसम संशयास्पदरीत्या रिक्षेतून फिरताना आढळले. त्यांच्याजवळ पिशव्या होत्या. हेच ते इसम असावेत करून पोलिसांनी त्यांना घेरले. त्यांच्या जवळील झडतीमधून पोलिसांनी दोन हजार १८० ग्रॅम वजनाचा ३२ हजाराचा गांजा जप्त केला. त्यांना पोलिसांनी तातडीने अटक केली. त्यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>देशातील पहिल्या समुद्री भुयारी मार्गिकेतून इतक्या वेगात धावणार बुलेट ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

नशामुक्ती अभियानाची कारवाई गांधारी पूल भागात सुरू असताना विशेष पोलीस पथकाला एक इसम तेथे घुटमळताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जाफर मनोज इराणी असे त्यांनी नाव सांगितले. त्यांच्या अंगझडतीत १० ग्रॅम वजनाची मेफाड्रोन (एम. डी.) पावडर पोलिसांना मिळाली. जाफर आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील रहिवासी आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवले, गायकवाड, उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार कसबे, जादव, सोनवणे यांच्या पथकाने केली.

Story img Loader