कल्याण – कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असेल किंवा कमळ चिन्हावर लढणारा कोणीही उमेदवार असेल त्याचेच काम करण्याचा निर्धार कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी शुक्रवारी रात्री घेतला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा इशारा भाजप कल्याण पूर्वच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. आमदार गायकवाड यांचे समर्थक हे भाजपा कार्यकर्ते आहे असे आम्ही मानत नाही. त्यामुळे भाजपाचा आम्हाला विरोध आहे असे मानण्याचे कारण नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले.
कल्याण पूर्वचे शहरप्रमुख खासदार शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यापासून आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहेत. शहरप्रमुख गायकवाड यांच्या कृत्यामुळे आमदार गायकवाड यांना गोळीबार आणि तुरुंगात जावे लागल्याची भाजप कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार किंंवा कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार असेल तर त्याचे काम आम्ही करू अशाप्रकारचे सह्यांचे एक निवेदन आमदार गायकवाड समर्थकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठविण्यात येणार आहे, असे एका आमदार गायकवाड समर्थकाने सांगितले. कोणत्याही परिस्थितीत कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ता हा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही, अशी चर्चा आम्ही केली असल्याचे या कार्यकर्त्याने सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार गायकवाड झिंदाबाद अशी जोरदार घोषणाबाजी केली. कल्याण पूर्व भागात आमदार गायकवाड यांची सुमारे एक लाखाहून अधिकची मते आहेत. त्यामुळे या मतांच्या बेगमीचा विचार करून भाजपने कल्याण लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?
कल्याण पूर्व भागात भाजप कार्यकर्त्यांनी काय, कुठे बैठक घेतली याची आपणास माहिती नाही. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील घरी झालेल्या बैठकीत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे ठरले आहे. त्यामुळे कल्याण पूर्वत कोणी काय निर्णय घेतला आहे. हे पहावे लागेल. आमदार गायकवाड यांना कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे १०० टक्के समर्थन आहे. त्यांच्या समर्थनार्थ कोणी काही मागणी केली तर त्यात गैर काही नाही. ती प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. – नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप, कल्याण जिल्हा.
आमदार गणपत गायकवाड हे आमचे मार्गदर्शक आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन होत असताना तो होऊ नये म्हणून खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष वकील उभा केला. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या जामिनीचे काम होऊ शकले नाही. खासदार शिंदे हे आमच्या नेत्याच्या विरोधात काम करत असतील तर आम्ही पण त्यांना का सहकार्य करावे. – संजय मोरे, अध्यक्ष, भाजप कल्याण पूर्व मंडल.